डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

0
293

किरकोळ कारणावरून झालेल्‍या भांडणात तीन जणांनी एका तरुणाच्‍या डोक्‍यात दगड घालून खून केला. ही घटना शुक्रवारी दुपारी सव्‍वादोन वाजताच्‍या सुमारास शाहूनगर, चिंचवड येथे घडली.

प्रसाद राजेश शिंदे (वय २६) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. बाळू शंकर परदेशी (वय ५३, रा. मु. पो. शिरवली, ता. बारामती, जि. पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अज्ञात संशयितांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. चिखली पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ निरीक्षक राजेंद्र बर्गे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी परदेशी आणि मयत प्रसाद हे मासेमारी करण्‍यासाठी शाहूनगर येथील तळ्यावर गेले होते. त्‍यावेळी तिथे आलेल्‍या तीन आरोपींनी त्‍यांना येथे मासेमारी करू नका, असे सांगत शिवीगाळ करीत धक्‍काबुक्‍की करण्‍यास सुरूवात केली. तसेच प्रसाद यांच्‍या डोक्‍यात दगडाने मारहाण करून पाण्‍यात ढकलून देत जीवे मारण्‍याचा प्रयत्‍न केला. याबाबत गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर उपचारादरम्‍यान प्रसाद यांचा मृत्‍यू झाला. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.