डोंबवली स्फोटाला सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार; संजोग वाघेरेंचा आरोप

0
90
  • नियमावलीत बदल करून कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

डोंबवली एमआयसीडीसी परिसरात एका कंपनीत झालेल्या स्फोटात कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. मोठ्या प्रमाणात जिवित व वित्त हानी झाली आहे. या घटनेला इतरांना जबाबदार धरले जात असतानाच सरकार आणि सरकारचे चुकीचे धोरण देखील जबाबदार आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे. तसेच, नियमावलीत बदल करून कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या संदर्भात वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डोंबिवलीतील एमआयडीसी भागात असलेल्या अमुदान या केमिकल कंपनीत गुरुवारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता. या घटनेत ८ कामगार ठार झाले होते. तसेच ६५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. याबरोबरच त्या कंपनीच्या शेजारील काही कंपन्यांचंही मोठ्या प्रणाणात नुकसान झालं होतं. स्फोटानंतर लागलेल्या आगीत ही कंपनी भस्मसात झाली. या स्फोटाने तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला होता. या स्फोटाप्रकरणी कंपनीच्या मालकावर कारवाई झाल्याचे समजले. यासोबत काही इन्स्पेक्टरवर देखील कारवाई केली जात असल्याचे समजले. मात्र, या संपूर्ण घटनेला कुठेतरी सरकार आणि सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याचेही दिसते आहे.

राज्य शासनामार्फत भाजप सरकार असताना ऑगस्ट 2017 मध्ये कंपन्यांचे इन्स्पेक्शन (तपासणी) करण्याच्या नियमावलीत बदल केला होता. “कामगार आयुक्तालय, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत करण्यात येणाऱ्या निरीक्षणांसाठी केंद्रीय निरीक्षण प्रणाली तयार करणे” हाच तो शासन निर्णय आहे. या शासन निर्णयानुसार केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकराने इन्स्पेक्शन बंद करणारे धोरण राबविले. परंतु, डोंबविली येथील घटनेप्रकरणी सरकार जबाबदारी झटकून टाकत आहे. इन्स्पेक्शन बंद केल्यानंतर आता कंपनी इन्स्पेक्टरला दोषी ठरविले जात आहे. प्रत्यक्षात इन्स्पेक्टरपेक्षा या संपूर्ण प्रकाराला सरकार आणि सरकाराचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. त्यांनी कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. परिणामी, या घटनेमुळे लाखो कामगारांना आपला जीव गमावावा लागला, असे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.