‘तुकाराम बीज’च्या दुसऱ्या दिवशी ‘स्वच्छ देहू, पवित्र देहू’ संकल्पनेंतर्गत राबविणार मोहीम
मावळ आणि पिंपरी चिंचवड शहरातील श्रीसदस्य होणार सहभागी
दि . १५ – संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज बीज सोहळा रविवारी (दि. १६ मार्च) असून या सोहळ्यानिमित्त राज्यासह देशभरातील लाखो वारकरी आणि भाविक देहूत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छ देहू, पवित्र देहू’ या संकल्पनेंतर्गत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी (दि. १७ मार्च) स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात येणार आहे.
भारताचे स्वच्छतादूत, पद्मश्री तथा महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बीजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत देहूगावातील मुख्य कमान ते वैकुंठ गमन स्थान (छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे व मुख्य मंदिर मार्गे), मुख्य मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाट परिसर, गाथा मंदिर परिसरासह मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानामध्ये मावळसह पिंपरी चिंचवड शहरातील श्रीसदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
“स्वच्छता ठेवा देव येई घरा। अंतर्बाह्य शुद्ध करा जीवा।।” जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांतून आध्यात्मिकतेसोबतच सामाजिक शुचिता आणि स्वच्छतेवर भर दिला होता. त्यामुळे हा उपक्रम त्यांच्या शिकवणीशी सुसंगत आहे आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रतिष्ठानच्या वतीने ‘स्वच्छ देहू, पवित्र देहू’ या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.