डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर!

0
34

दि. २7 (पीसीबी)  – देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी (26 डिसेंबर) अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारावेळी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या निधनाने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

पार्थिव दिल्लीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार :

डॉ. मनमोहन सिंह यांचे पार्थिव दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. या दरम्यान, देशातील विविध राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक त्यांच्या अंतविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. भारत सरकारने त्यांच्या सम्मानार्थ 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे, या काळात सर्व निर्धारित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे, “मनमोहन सिंह यांनी असीम बुद्धिमत्ता आणि ईमानदारी यांच्या साथीने भारताचे नेतृत्व केले. डॉ. मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातील जाण खूप उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहील. श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधींनी शोक व्यक्त केला.

डॉ. मनमोहन सिंह हे एक प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञ, शिक्षक आणि राजकारणी होते. त्यांचा जन्म 1932 मध्ये पंजाबमध्ये झाला होता. त्यांनी आपली कारकीर्द एक शिक्षक म्हणून सुरू केली आणि नंतर ते भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर, वित्त मंत्री आणि दोन वेळा भारताचे पंतप्रधान बनले. 2004 ते 2014 या काळात त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केले आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

त्यांच्या कार्यकाळात भारताने आर्थिक सुधारणांचा एक नवीन युग अनुभवला, ज्यामुळे देशाची आर्थिक वाढ वेगवान झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रात प्रगती केली, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याण यासारख्या क्षेत्रांचा समावेश होतो.