बेंगळुरु, दि. १२ (पीसीबी) – कर्नाटकमधील शिग्गाव विधानसभेचे माजी आमदार सईद आझमपीर खादरी यांनी सोमवारी कर्नाटकमध्ये बोलतना म्हटले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इस्लाम स्वीकारण्यास तयार होते”. शिग्गाव येथे पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसने याठिकाणी यासिर अहमद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एका सभेत बोलत असताना सईद खादरी यांनी म्हटले की, आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार झाले होते. मात्र नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आंबेडकरांनी जर इस्लाम धर्म स्वीकारला असता तर संपूर्ण दलित समाज त्यांच्या पाठोपाठ इस्लाम स्वीकारता झाला असता.
सईद आझमपीर खादरी एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, आज जे प्रमुख दलित नेते आहेत, त्यांचीही नावे ही इस्लाम धर्मावरून पडली असती. जसे की, आर.बी. थिम्मापूर हे कदाचित रहीम खान झाले असते. डॉ. जी. परमेश्वर हे कदाचित पीर साहब, एल. हनुमंता हे कदाचित हसन साहब आणि मंजुनाथ थिम्मापूर हे कदाचित बडोसाहब या नावाने ओळखले गेले असते.
दलित आणि मुस्लीम समुदायामध्ये ऐतिहासिक असे नाते असल्याचेही सईद यांनी पुढे सांगितले. मुस्लिम दर्गा आणि दलित समाजाची प्रार्थना स्थळे यात साधर्म्य असल्याचेही त्यांनी म्हटले. सईद खादरी यांचे हे विधान सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे. यानंतर काँग्रेसने मात्र या विधानापासून हात झटकले आहेत. खादरी यांना काँग्रेसने तिकीट नाकारले होते. त्यामुळे ते आता अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवत आहेत.