महाराष्ट्रातील सर्वोत्तम ब्रेन-स्टेम-डेथ (बीएसडी) टीम म्हणून गौरव या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट रुग्णालय
दि . ६ (पीसीबी) – पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘बेस्ट बीएसडी पुरस्कार’ आणि ‘सर्वोत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण समन्वयक पुरस्कार’ प्रदान करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील ‘सर्वोत्तम ब्रेन-स्टेम-डेथ (BSD) टीम’ म्हणून रुग्णालयाचा गौरव करण्यात आला.
भारतीय अवयवदान दिनानिमित्त प्रादेशिक सह राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटना (ROTTO-SOTTO) (पश्चिम विभाग व महाराष्ट्र) यांनी आयोजित केलेल्या विशेष सत्कार समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री श्री. प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण आणि अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या संचालिका डॉ. वृषाली पाटील उपस्थित होत्या.
याच कार्यक्रमात रुग्णालयाच्या वासंती मुसाळदे आणि अलिशिबा वाकडे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल ‘सर्वोत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण समन्वयक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या समारंभाला श्री. प्रकाशराव आबिटकर- कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्यासह डॉ. आकाश शुक्ला – संचालक, ROTTO-SOTTO आणि डॉ. संगीता रावत अधिष्ठता, सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल तसेच विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते.
“अवयवदान चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढे येणे आवश्यक आहे. प्रत्यारोपणानंतरचे निरोगी आणि सुदृढ आयुष्य सर्वांसमोर आणले पाहिजे. अवयवदानाच्या प्रक्रियेमध्ये लोकांची जागरूकता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, आज अनेक सामाजिक संस्था आणि रुग्णालये अवयवदानाविषयी जनजागृती करत जनतेच्या मानसिकतेत बदल घडवत आहेत, ही एक सकारात्मक बाब आहे.” त्यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.
“आमच्या रुग्णालयाला मिळालेला हा पुरस्कार अवयवदान आणि प्रत्यारोपण मोहिमेला अधिक बळ मिळाले आहे. आमची ही मोहीम अविरत सुरू राहील. ROTTO-SOTTO आणि शासनाने आमच्या कार्याची दखल घेतल्याने आमच्या कामाची उंची अधिक वाढली आहे,” असे मत डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी पुणे यांनी व्यक्त केले. या यशाबद्दल त्यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
“अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील आमच्या रुग्णालयाचे काम आज अनेक रुग्णांसाठी जीवनदान ठरत आहे. या मोहिमेला अवयवदात्यांच्या कुटुंबांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे अधिक बळकटी मिळत आहे. आमच्या रुग्णालयात जागतिक दर्जाच्या सेवा-सुविधा, अनुभवी आणि तज्ञ डॉक्टर्स तसेच समुपदेशकांद्वारे अवयवदान व प्रत्यारोपण मोहिमेला गती मिळाली आहे आणि हा मिळालेला पुरस्कार त्याच कामाची पोचपावती आहे,” असे मत डॉ. भाग्यश्री पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी पुणे यांनी व्यक्त केले.
या यशाबद्दल बोलताना डॉ. यशराज पाटील म्हणाले, “हा गौरव आम्हाला अधिक जबाबदार बनवतो. भविष्यात आम्ही यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, नेत्र, हृदय आणि फुफ्फुस यांसारख्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये अधिक प्रगती करू आणि इतर अवयवांच्या प्रत्यारोपणाचाही संकल्प केला आहे. अवयवदानाला प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त लोकांना जीवनदान देणे हेच आमचे ध्येय आहे. तसेच अवयवदान आणि प्रत्यारोपणाच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ब्रेन-स्टेम-डेथ (BSD) टीम म्हणून गौरव हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. हे यश आमच्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाचे आणि समर्पित टीमवर्कचे प्रतीक आहे.”
हा पुरस्कार समारंभ डॉ. सेन व डॉ. किनारे सभागृह,सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटल,परळ, मुंबई येथे संपन्न झाला.