डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

0
7

पिंपरी, दि. २२ – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास महादेव कदम यांनी सोमवारी (दि.२२) काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे सुपूर्द केला. दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी वेणू गोपाल यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या तात्कालीन अध्यक्ष खासदार सोनिया गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने डॉ.कैलास कदम यांची निवड पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी केली होती.
काँग्रेस पक्ष संक्रमण अवस्थेत असताना कदम यांनी शहराध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतली. काँग्रेस पक्ष वाढीसाठी तसेच घरोघरी पक्षाचे चिन्ह पोहचवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि आता सोमवारी त्यांनी काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
वेणू गोपाल यांना दिलेल्या राजीनामा पत्रात कदम यांनी म्हटले आहे की, “मी कैलास महादेव कदम, तुम्ही मला दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या पत्रानुसार पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदावर काम करीत आहे. परंतु, आज सोमवार, दि.२२ डिसेंबर २०२५ रोजी मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस पक्ष शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. मला कार्यमुक्त करावे. ही नम्र विनंती. मी पुढे काँग्रेस चा प्राथमिक सदस्य पदावर काम करणार आहे.”
डॉ. कदम यांनी जरी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला, तरी काँग्रेसचे प्राथमिक सदस्य पदावर काम करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना डॉ. कदम यांनी सांगितले की, मी विद्यार्थी दशेपासून पिंपरी चिंचवड शहरात आणि औद्योगिक पट्ट्यात काँग्रेसचे काम करीत आहे.
सन १९९७ मध्ये राज्यात आणि केंद्रामध्ये युतीचे सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गांधीनगर पिंपरी वॉर्ड मधून काँग्रेसच्या उमेदवारीवर युवतीला बिनविरोध निवडून आणण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २००७ मध्ये खराळवाडी वॉर्ड मधून निर्मला कदम यांना निवडून आणले. २०१२ मध्ये गांधीनगर प्रभागातून माझ्यासह दोन्ही उमेदवार आणि खराळवाडी प्रभागातून सद्गुरु कदम यांना निवडून आणले. यावेळी मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गटनेता आणि विरोधी पक्षनेता पदाची संधी काँग्रेसने दिली. सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडची उमेदवारी मिळाली होती. माझे संघटन कौशल्य विचारात घेऊनच काँग्रेस पक्षाने माझ्यावर पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाची जबाबदारी पक्ष अडचणीत असताना सोपविली होती, तरी देखील मी पक्ष वाढीसाठी शंभर टक्के योगदान दिले आहे. मी आज फक्त काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य म्हणून यापुढेही मी काम करणार आहे असे डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.