डॉक्टरकडे 5 लाखाची खंडणी मागून 4 लाख रुपये घेताना पत्रकारासह एका महिलेला अटक

0
363

पिंपरी दि. २ (पीसीबी)-चुकीचे उपचार केल्यामुळे गावठी श्वान मेला असल्याचे सांगून नुकसान भरपाई म्हणून डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणी मागून 4 लाख रुपये घेताना पत्रकारासह एका महिलेला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने बेड्या ठोकल्या आहेत. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये सापळा रचून केली आहे.

नूतन राजेश पारखे (टोळगे), (वय- 47 रा. कसबा पेठ पोलीस चौकीजवळ, पुणे), पत्रकार संदीप थकाजी शिंगोटे (वय-38 रा. वडगाव शेरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका अनोळखी व्यक्तीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयपीसी 384, 385, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. अशोक कृष्णा भोंडवे (रा रहाटणी, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी नूतन पारखे यांनी गावठी श्वान डॉ. भोंडवे यांच्याकडे उपचारासाठी नेला होता. परंतु चुकीच्या उपचारामुळे श्वान मेल्याचा आरोप करत नूतन आणि संदीप यांनी डॉक्टरांकडे पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली. तसेच तुमच्या घरावर महिलांचा मोर्चा घेऊन येईल. जर तुम्ही पैसे दिले नाही तर दवाखाना आणि घर जाळुन टाकण्याची धमकी डॉक्टर भोंडवे यांना दिली. याबाबत डॉक्टरांनी तक्रार अर्ज केला होता.

या तक्रार अर्जाची चौकशी खंडणी विरोधी पथक एकने केली असता आरोपींनी डॉक्टरांकडे पाच लाख रुपये खंडणी मागून तडजोडी अंती चार लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी तक्रारदार डॉक्टर यांना चार लाख रुपये घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये बोलावले.
खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून खंडणीची चार लाख रुपये रक्कम घेताना दोघांना रंगेहाथ पकडले.
पुढील तपास खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे ,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे ,
सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव,
महिला पोलीस अंमलदार हेमा ढेबे, संजय भापकर, रविंद्र फुलपगारे, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, विजय कांबळे, गंगावणे यांच्या पथकाने केली.