दि. ४ (पीसीबी) – स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर जसा जसा वाढतोय, तसे तसे सायबर चोरीचे प्रमाणही वाढले आहे. सायबर चोरटे वेगवेगळ्या क्लुप्त्याद्वांरे फसवणूक करत असतात. डेटिंग ॲपला तरुणांमध्ये चांगली प्रसिद्धी मिळाल्यानंतर यावरही अनेकांची फसवणूक केली जात आहे. नुकतेच दिल्लीतून एका सायबर चोरट्याला अटक करण्यात आली. हा चोर नोएडातील एका खासगी कंपनीत दिवसा काम करत असे आणि रात्री अमेरिकाचा मॉडेल असल्याचे दाखवून डेटिंग ॲपवर वावरत असे. या माध्यमातून आरोपीने अनेक महिलांची फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पूर्व दिल्लीच्या शकरपूर भागातून तुषार सिंह बिष्ट (वय २३) नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याने ७०० हून अधिक महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषारने बीबीएची पदवी मिळवलेली आहे. मागच्या तीन वर्षांपासून तो नोएडातील एका खासगी कंपनीत रिक्रूटर म्हणून काम करतोय. त्याचे वडील चालक असून आई गृहिणी आहे. तर बहीण गुरुग्राम येथील कंपनीत काम करते. तुषारलाही चांगली नोकरी होती, मात्र तरीही लालसेपोटी तो सायबर क्राइम सारख्या गुन्हेगारीच्या क्षेत्रात उतरला.
व्हर्च्युअल आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरचा वापर करून तुषारने लोकप्रिय डेटिंग साईट्स आणि सोशल मीडियावर फेक प्रोफाइल तयार केले होते. ब्राझिलमधील एका मॉडेलचे फोटो आणि व्हिडीओ चोरून त्याने स्वतःच्या अकाऊंटवर टाकले होते. तो अमेरिकेतील मॉडेल असून त्याला भारतात यायचे असल्याचे त्याने भासवले होते. १८ ते ३० या वयोगटातील महिलांना आरोपी हेरायचा आणि त्यांच्याशी मैत्री करायचा.
एकादा का महिलेशी मैत्री झाली की जवळीक साधत तो महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ मागत असे. पीडितेंच्या नकळत आरोपी हे फोटो आणि व्हिडीओ स्वतःच्या मोबाइलवर सेव्ह करत होता. आरोपीने सुरुवातीला हे चाळे फक्त मजेसाठी सुरू केले होते. मात्र नंतर त्याने यामाध्यमातून पद्धतशीरपणे खंडणी मागण्याची योजना आखली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपीने आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओच्या बदल्यात पीडित महिलांकडून पैशांची मागणी केली. मात्र पीडितेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर हे सदर आक्षेपार्ह सामग्री इंटरनेटवर किंवा डार्क वेबला विकण्याची धमकी आरोपीकडून दिली जात असे.
पीडित महिलांची संख्या किती?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषारने बंबल या साईटवर जवळपास ५०० आणि स्नॅपचॅट आणि व्हॉट्सॲपवर २०० महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. १३ डिसेंबर रोजी पश्चिम दिल्लीच्या सायबर पोलीस ठाण्यात एका पीडितेने (महाविद्यालयीन विद्यार्थी) तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये तिने सांगितले की, जानेवारी २०२४ मध्ये तिची ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्म बंबलवर तिची आरोपीशी ओळख झाली. त्याने स्वतःला अमेरिकेतील फ्रिलान्सर मॉडेल असल्याचे सांगितले. त्याला काही कामानिमित्त भारतात यायचे असल्याचे तो सांगत असे. पुढे दोघांचीही मैत्री झाली आणि ते अधूनमधून चॅटिंग करू लागले. चॅटिंगदरम्यान पीडितेचे विश्वास संपादन करत आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ मिळवले.
पीडितेने अनेकदा त्याला समक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र आरोपी काहीना काही कारण देऊन टाळाटाळ करत असे. यानंतर आरोपीने पीडितेच्या व्हॉट्सॲपवर तिचेच आक्षेपार्ह फोटो पाठवून पैशांची मागणी केली. यानंतर पीडितेने त्याला काही पैसे पाठवले. मात्र आरोपीकडून आणखी पैशांची मागणी होऊ लागली. त्यानंतर पीडितेने याची तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.