डी मार्टमधील सुपरवायझरने 83 डबे तेल केले लंपास; सुपरवायझरला अटक

0
730

देहूरोड, दि. १ (पीसीबी) – किवळे येथील डी मार्टमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणा-या एकाने डी मार्टमध्ये आलेले वेगवेगळ्या तेलाचे एकूण 83 डबे आणि किराणा मालाचे कॅरेट्स परस्पर विकले. याप्रकरणी सुपरवायझर आणि त्याच्याकडून चोरीचा माल खरेदी करणा-या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 10 एप्रिल 2022 ते 30 मे 2022 या कालावधीत किवळे येथील डी मार्टमध्ये घडला.

अक्षय राजेंद्र मोरे (रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे अटक केलेल्या सुपरवायझरचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचा माल खरेदी करणारे तेजस चंदनशिव (रा. किवट शिंड, ता. भोर) आणि किरण शंकर मोरे (रा. कर्नावड, पुणे) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्टोअर मॅनेजर मयूर विश्वास गुरव (वय 36, रा. वाकड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय हा किवळे येथील डी मार्टमध्ये मागील दीड महिन्यापासून सुपरवायझर म्हणून काम करत होता. त्याने डी मार्ट वेअर हाऊस मधील कीर्ती गोल्ड सूर्यफूल तेल 20 डबे, जेमिनी सूर्यफूल तेल 14 डबे, जेमिनी सोयाबीन तेल 13 डबे, सनी सूर्यफूल तेल 10 डबे, फॉर्च्युन सूर्यफूल तेल 8 डबे, कीर्ती गोल्ड सोयाबीन तेल 8 डबे, फॉर्च्युन राईसब्रेन तेल 4 डबे, धारा सूर्यफूल तेल 3 डबे, सफोला ऍक्टिव्ह तेल 3 डबे आणि किराणा माल भरलेले कॅरेट्स असा एकूण तीन लाख 17 हजार 670 रुपयांचा माल स्कॅन केला नाही.

तेलाचे 83 डबे आणि किराणा मालाचे कॅरेट्स डी मार्ट वेअर हाऊस येथील स्टाफ तसेच ट्रान्सपोर्टच्या टेम्पो चालकाला माहिती न देता आरोपी तेजस आणि किरण यांना तो माल विकला. पोलिसांनी सुपरवायझर अक्षय याला अटक केली. तसेच त्याच्याकडून चोरीचा माल खरेदी करणा-यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.