डीबीटी योजनेंतर्गत १०.०९ कोटी रुपये वितरित

0
273

पिंपरी, दि. ३०(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते आठवीमधील २८ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण म्हणून १०.०९ कोटी रुपये वितरित केले आहेत. इयत्ता पहिली ते आठवीमधील काही विद्यार्थ्यांचे बँक तपशील चुकीचे आढळले होते त्यामुळे पुन्हा योग्य बँक तपशील मागविण्यात आले आहेत.

डीबीटी योजनेंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या आर्थिक सहाय्याचा उद्देश महापालिका हद्दीतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चात सुधारणा करणे आहे. डीबीटी योजना लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट निधीचे पारदर्शक आणि सुव्यवस्थित हस्तांतरण सुनिश्चित करते, मध्यस्थांना दूर करते आणि वितरणात होणारा विलंब कमी करते. या तंत्रज्ञानावर आधारित दृष्टिकोनाचा फायदा घेऊन, महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक चिंता न करता त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल. डीबीटी योजनेंतर्गत लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट निधी जमा करून महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किंवा इतर शालोपयोगी वस्तू घेण्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे. या योजनेअंतर्गत, इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ३५००रुपये, तर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ३७०० रुपये निधी मिळतो. हा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. इयत्ता पहिली ते आठवीमधील काही विद्यार्थ्यांचे बँक तपशील चुकीचे आढळून आले. सुव्यवस्थित रक्कम हस्तांतरणासाठी असे तपशील सुधारित केले जात असुन इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर २.०३ कोटी रुपयांचा निधी या आठवड्यात जमा केला जाईल.

महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, डीबीटी माध्यमातून शैक्षणिक साहित्याच्या गुणवत्तेबद्दल असलेले विविध प्रश्न दूर होण्यास मदत होणार आहे. शैक्षणिक साहित्याच्या गुणवत्ता आणि दर्जाबाबत यापूर्वीही पालक आणि कार्यकर्त्यांच्या तक्रारी आल्या होत्या. आता, शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची निवड पालकांकडे आहे. डीबीटी योजनेंतर्गत निधीचे यशस्वी वितरण केले जात असुन त्यातून महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लागणारे चांगल्या गुणवत्तेचे शालेय साहित्य उपलब्ध होत आहे. निधीबाबत पालकांनी काळजी करण्याचे कारण नसुन या योजनेंतर्गत मिळणारा निधी पालकांच्या बँक खात्यात थेट जमा केला गेला आहे. यातून महापालिकेची शैक्षणिक वाढ जोपासण्याची वचनबद्धता दिसून येत आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनाही लवकरात लवकर निधीचे वितरण केले जाईल.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील म्हणाले, डीबीटी योजनेअंतर्गत महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीला पालक, विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. महापालिका प्रशासन उत्साही शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील.

महापालिकेचे शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात म्हणाले, खात्यात जमा झालेला निधी हा केवळ शैक्षणिक साहित्य विकत घेण्यासाठीच वापरण्यात यावा. पालकांनी विकत घेतलेल्या शैक्षणिक साहित्याच्या पावत्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा कराव्यात. संबंधित पर्यवेक्षकांकडून या पावत्यांची पडताळणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या १२८ शाळा आहेत, त्यामध्ये ११० प्राथमिक शाळा आणि १८ माध्यमिक शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने डीबीटी व्यतिरिक्त आतापर्यंत ४० हजार ३१६ गणवेषांचे वाटप केले आहे.