डीपी तील ९३ आरक्षणांवर पीएमआरडीए ची सुध्दा हरकत

0
6

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचा सुधारीत विकास आराखडा हा अत्यंत चुकिचा, सामान्य नागरिकांवर आणि भुमिपूत्रांवर अन्याय करणारा असल्याने तब्बल ४९ हजार ७३० नागरिकांनी लेखी हरकती आणि सुचना दिल्या. दरम्यान, पुणे महानगर क्षेत्रिय विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए ने सुध्दा विविध ९३ भूखंडांबाबत हरकत घेतली आहे. सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे आकुर्डी आणि चिखली कमर्शियल डिस्ट्रीक सेंटरचे रुपांतर सरळ सरळ निवासी भूखंडात केल्याचे समोर आले आहे.

पूर्वीच्या पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकणाचे काही क्षेत्र ७ जून २०२१ रोजी अधिसुचना काढून पीएमआरडीएमध्ये विलिनीकरण कऱण्यात आले. मोकळ्या जागा आणि निधी पीएमआरडीए कडे देण्यात आला. प्राधिकऱणाने भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड, विकसीत केलेल्या विविध पेठा तसेच २७० हेक्टरवरचे अतिक्रमण झालेल्या क्षेत्राचा ताबा व मालकीसुध्दा महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आली. १ ते ४२ पेठांधील एकूण ९९६.८५ हेक्टर पैकी २७०.१८ हेक्टर भूखंडावर अतिक्रमण झालेले आहे.
सुधारीत विकास आराखड्यात पेठ क्रमांत ५ ते ८ मधील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषद केंद्र, पेठ क्रमांक ९,११,१२ आणि भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्र हेसुध्दा दाखविणे आवश्यक होते, प्रत्यक्षात नकाशात ते दर्शविण्यात आलेले नाही. काही महत्वाच्या जागांमध्ये काहीसे फेरबदल केलेले दिसून येते, असे हरकतीत नमूद केले आहे.
१९९५ चा जुना विकास आराखडा आणि प्राधिकऱणाच्या जुन्या आराखड्यातील शिल्लक निवासी क्षेत्र यातसुध्दा काहीचा गोंधळ आहे. मूळ शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या बदल्यात जादाचा मोबदला म्हणून एकही पाच गुंठा परतावा देण्यासाठी आरक्षित ठेवलेल्या क्षेत्रावर दुसरेच आरक्षण असल्याचे निदर्शनास आले. सुमारे ३०० गुंठे परतावा जमिनीचे रिक्त क्षेत्र सुधारीत विकास आराखड्यात अन्य काही आरक्षणांत दर्शविल्याने पीएमआरडीए ने हरकत घेतली आहे. परतावा जमिनीची पूर्व बांधिलकी असल्याने अशा क्षेत्रांवरचे आरक्षण कमी कऱण्याची सुचना पीएमआरडीए ने हरकत अर्जात केली आहे. संबंधीत सर्व ९३ भूखंडांची यादीच सोबत जोडली आहे.
आकुर्डी आणि चिखली जिल्हा केंद्राचे क्षेत्र निवासीकरणाला हरकत घेतली आहे. रहाटणी येथील बस डेपो आणि खुले मैदानाचे पूर्वीचे आरक्षण होते तिथे निवासीकरण दाखवले आहे त्याला हरकत घेतली आहे. रहाटणी येथील टॉवर लाईन आणि कॅनल खालची जागा टक्क निवासी केल्याचे डीपी मध्ये असल्याने आश्चर्य व्यक्त कऱण्यात आले. सांगवी येथे पोलिस स्टेशनसाठी राखून ठेवलेल्या भूखंडावर सुधारीत आराखड्यात भाजी मंडई दाखवली आहे.
थेरगाव येथील लोकल कमर्शियल सेंटरची जागासुध्दा निवासी दाखवली आहे. रावेत येथील सार्वजनिक वापरा तसेच मोकळी जागासुध्दा निवासीकरण केली आहे. निगडी येथील खुली जागा पोलिस स्टेशनसाठी आरक्षित केली आहे. चिखली येथील ८.७४ हेक्टर शेती क्षेत्राचे निवासीकरण केले आहे तर सार्वजनिक वापराच्या जागेचे निवासीकरण केले आहे. मोशी, बोऱ्हाडेवाडी मध्ये पाण्याच्या टाकिची आणि मोकळ्या जागेचे निवासीकरण केले आहे. भोसरीमध्ये से. १० मधील परतावा जमिनीचे क्षेत्र ओद्योगिक केले आहे.