डिफेन्स एक्स्पो महाप्रदर्शनात डिफेन्स एम एस एम ई कंपन्यांचा सहभाग

0
212

पुणे, दि. २३ (पीसीबी) – सामर्थ्यशाली भारतीय सैन्यदलाच्या शस्त्रसामग्रीचे प्रतिबिंब असलेल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’चे आयोजन दि .२४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून पुण्यातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर(मोशी) येथे करण्यात आले असून निबे लिमिटेड ही कंपनी ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ ची नॉलेज पार्टनर आहे तर एल अँड टी,सोलर,टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स ,भारत फोर्ज लिमिटेड या कंपन्या स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत.

‘संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन(डीआरडीओ) च्या सहकार्याने महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सक्षम करणारा महाराष्ट्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच डिफेन्स एक्स्पो असून हे प्रदर्शन आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रातील वाढ आणि नवकल्पनांना चालना देणारे असेल,प्रेरणादायी ठरेल ‘असा विश्वास या प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर असलेल्या निबे लिमिटेड या कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी व्यक्त केला आहे.

‘निबे लिमिटेड ‘ ने भारतीय संरक्षण दलांसाठी उत्पादित केलेल्या शस्त्रात्रे,संरक्षण सामग्री यांचे स्टॉल या प्रदर्शनात असणार आहेत.विद्यार्थी,नागरिक यांना तेथे महिती दिली जाईल. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राविण्य असणाऱ्या उद्योगातील समन्वयाला चालना देण्याच्या उद्देशाने जल, स्थल आणि वायू या तिन्ही सुरक्षा दलांचा यात महत्त्वाचा सहभाग आहे. यात दोनशेहून अधिक सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप आणि २० हजारहून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी एकत्र येऊन ज्ञानाची देवाण-घेवाण करतील.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे राज्य असून शासनाच्या सहकार्याने डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात ‘निबे लिमिटेड ‘प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही गणेश निबे यांनी दिली.