पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या मागे लागलेले संकट काही संपत नाहीत. राज्यात महामंडळाच्या सुमारे 13 हजार एसटी मधून दिवसाला अंदाजे 30 लाखापेक्षा प्रवाशांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडलेला आहे.
सणासुदीच्या कालावधीमध्ये डिझेलला पैसे नाही म्हणून बस बंद ठेवायचा प्रकार समोर आला आहे. डिझेलमुळे एसटी बंद करून प्रवाशाना संकटात टाकून खासगी बसला चालना देण्यासाठी शिंदे सरकारचा हा डाव असल्याचा आरोप कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केला. येत्या चार दिवसात डिझेलला निधी दिला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
एसटी महामंडळाच्या, शिवाजीनगर, वल्लभनगर आगारास भेट देऊन कष्टकरी कामगार,विविध प्रवासी व नागरिकांशी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे चर्चा करून अडचणी समजून घेतल्या. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक सचिव तुषार घाटुळे, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजू बिराजदार, नूर मोहम्मद अशोक गुप्ता, व्यंकट निरगुडे, अंबालाल सुकवाल, मनोज यादव ,रामभाऊ शेलार आदी उपस्थित होते.
पुणे व चंद्रपूर आगारातून पैसे नाही म्हणून बसेस बंद आहेत. सुमारे 8 हजार कोटी पेक्षा अधिक महसूल मिळवणाऱ्या एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 53 टक्के तर इंधनावर 35 टक्के खर्च करावा लागतो. भांडवली खर्चासाठी पैसे शिल्लक नसल्याचे चित्र नेहमीच जाणवते. महामंडळाच्या पुणे , वल्लभनगर आगारातून धावणाऱ्या सोलापूर, कोल्हापूर ,नाशिक, लातूर ,नांदेड, बीड ,मुंबई औरंगाबाद ,जालना, परभणी अशा विविध मार्गावरील बस सेवा या केवळ डिझेल नसल्याने बंद आहेत. हे सरकारच्या नाकर्तेपणाचे लक्षण असून दररोज 22 हजार किलोमीटरचा प्रवास थांबलेला असल्यामुळे दिवसाला 10 लाखाचे उत्पन्न बुडत असल्याचे निदर्शनास येत आहे.
बंदचा परिणाम सर्वसामान्य प्रवाशी, कष्टकरी कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे. हे आम्ही सहन करू शकत नाही. महामंडळाच्या बस बंद असल्यामुळे खासगी वाहनाने जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसून हे खासगी वाहनचालक प्रवाशांची लूट करत आहेत. खासगी बसेस अधिक मोठ्या प्रमाणात चालण्यासाठी प्रोत्साहन राज्य शासन देत आहे असा आरोपही नखाते यांनी केला.