पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या मतदान जनजागृती चित्रफितीचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण
दि.२७(पीसीबी)-लोकशाहीची खरी ताकद ही नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असते. मतदान हा केवळ हक्क नसून लोकशाहीप्रती आपले कर्तव्य आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे असून त्याच्या माध्यमातून नागरिक आपल्या शहराच्या आणि प्रशासनाच्या भवितव्याची दिशा ठरवतात. त्यामुळे कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले.
राज्य निवडणूक आयोग व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात मतदान जनजागृतीसाठी स्वीप (SVEEP) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मतदान जनजागृती चित्रफितीचे अनावरण आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांच्यासह उपायुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘स्वीप कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेली ही चित्रफित नागरिकांपर्यंत सोप्या, प्रभावी आणि भावनिक पातळीवर पोहोचणारे माध्यम ठरेल. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रथमच मतदान करणारे मतदार यांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता आहे. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यावर महापालिकेचा भर राहील. या चित्रफितीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल,’ असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.










































