मुंबई, दि. १९ : मुंबईत प्रथमच सायबर पोलिसांना सुरु असलेल्या डिजिटल अटक प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ दक्षिण मुंबईतील एका ८१ वर्षीय महिलेच्या घरी धाव घेतली. त्या महिलेची तब्बल ७.८ कोटींची फसवणूक झाली होती आणि फसवणूक करणारे तिला डिजिटल अटकेत ठेवून आणखी पैसे काढण्याचा प्रयत्न करत होते.
महिला मात्र सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकली होती. पोलिसांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला तरी तिने घरात प्रवेश देण्यास नकार दिला. जवळपास तासभर चाललेल्या या गोंधळानंतर, इमारतीच्या घरमालक व महिलेच्या मुलीच्या मदतीने अखेर तिला खरी वस्तुस्थिती पटवून दिली. त्यानंतर तिने पोलिसांना घरात प्रवेश दिला.
सायबर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून तिची बँक खाती गोठवली, त्यामुळे आणखी आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, १० जुलैपासून त्या महिलेने वेगवेगळ्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम हस्तांतरित केली होती. पतीचे निधन झालेले असून मुली विदेशात असल्याने ती एकटी राहत होती. या परिस्थितीचा गैरफायदा घेत फसवणूक करणाऱ्यांनी तिला खोटी माहिती देऊन डिजिटल डिटेन्शन मध्ये ठेवले होते.