डंपरचे चाक अंगावरून गेल्‍याने दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू

0
124

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) महाळुंगे – डंपरचे चाक अंगावरून गेल्‍याने दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू झाला. ही घटना तळेगाव चाकण रस्‍त्‍यावर खराबवाडी गावाच्‍या हद्‌दीत गुरुवारी (दि. २२) दुपारी चार वाजताच्‍या सुमारास घडली.
प्रमोद गोपीचंद सोनकांबळे (वय २५, रा. राणूबाई मळा, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. संजय लक्ष्मण लावंड (वय ५२, रा.टिंगरे नगर, विश्रांतवाडी, पुणे) यांनी गुरुवारी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच १४ जीयू ३५६६) डंपरवरील चालक राजकुमार साकेत (वय २५, सध्या रा. आंबळे ता. मावळ जि. पुणे) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी चार वाजताच्‍या सुमारास मयत सोनकांबळे हे दुचाकीवरून चालले होते. त्‍यावेळी भरधाव वेगात आलेल्‍या डंपरने दुचाकीला डाव्‍या बाजूने धडक दिली. त्‍यामुळे सोनकांबळे हे खाली पडले. त्‍यांच्‍या अंगावरून डंपरचे चाक गेल्‍याने त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.