दि. १२ (पीसीबी) : महाराष्ट्र मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या ठाणे महानगरपालिकेत मेगाभरती जाहीर झाली आहे. महापालिका आस्थापनेवरील गट-क व गट-ड ची रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या भरतीतून पालिकेच्या विविध विभागातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावेत असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ठाणे महानगरपालिका भरती २०२५ नुसार, या जाहिरातीमधील पदे प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकोष सेवा, इत्यादी सेवेमधील आहेत. या भरतीमधून एकूण १७७३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीसाठी आजपासून म्हणजेच १२ ऑगस्ट २०२५ पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. तर २ सप्टेंबर २०२५ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.