ठाणे दि. ७ (पीसीबी) – जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र आता ठाणे जिल्ह्यात देखील शिवसेनेला भगदाड पडले आहे. सध्या ठाणे महापालिकेवर कार्यकाळ संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या पंचवार्षिकला ठाणे महापालिकेत शिवसेनेचे एकूण ६७ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये माजी महापौर नरेश मस्के यांचा देखील समावेश आहे. या माजी नगरसेवकांनी बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन बंगल्यावर जाऊन भेट घेतली व शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. ६७ नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या मात्र शिवसेनेतच आहेत. या माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे ठाण्यात येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान केवळ ठाण्यातच नाही तर नागपुरात देखील हीच स्थिती पहायला मिळत आहे. नागपुरातील शिवसेना पदाधिकारी देखील लवकरच शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. नागपुरातील शिवसेनेचे पदाधिकारी हे बंडखोर आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नागपुरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे गटात सहभागी होऊ शकतात असा अदांज वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या अनेक शहरातील महापालिकेच्या निवडणुका अवघ्या कही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र ऐन महापालिकेच्या तोंडवरच शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्याने त्याचा मोठा फटका हा शिवसेनेला बसू शकतो. ठाणे, मुंबई आणि औरंगाबाद महापालिका शिवसेनेचा गड माणल्या जातो. मात्र यंदा ही निवडणूक शिवसेनेसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर आता पक्षाकडून सावध पाऊले उचलण्यात येत आहेत. शिवसैनिकांकडून एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र घेतले जात आहे. या प्रमाणपत्रामध्ये आमचा ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असून, आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे लिहून द्यावे लागत आहे. असे प्रमाणपत्र शिवसैनिक, शिवसेनेचे आमदार, पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकडून घेतले जात आहे. मात्र तरी देखील शिवसेनेत सुरू असलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. या प्रमाणपत्रावरून अनेकांनी शिवसेनेवर टीका देखील केली आहे.










































