मुंबई, दि. २१ (पीसीबी) : शिवसेनेचे जेष्ठ मंत्री एकनाथ शिंदे १३ आमदारांसह भाजपच्या छत्रछायेतील सुरतमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत सापडले आहे. कोणत्याही क्षणी सरकार कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल काल सोमवारी (ता.२०) लागला. या निकालात महाविकास आघाडीला धक्का बसला असून शिवसेनेतील अंतर्गत नाराजी नाट्य समोर आले आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले आहे. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि १३ समर्थक आमदार यांचे फोन नॉट रिचेबल असल्याचे समोर येत आहे. आणि ते सर्व सुरत येथील ली मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचेही समजत आहे. या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता आणखी वाढली आहे.
दरम्यान,यासंदर्भात शिवसेनेने आज मंगळवारी (ता. २१) शिवसेनेची बैठक दुपारी बोलावण्यात आली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसला मतदान करण्यावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. आणि फुटलेल्या मतांवरून शिवसेनेतच फूट पडली आहे. अशी माहिती समोर येत आहे.