ठाकरे-शाहांच्या पत्रकार परिषदेतून मला फडणवीसांनी बाहेर जायला सांगितलं – किरीट सोमय्यांचा घणाघात

0
103

मुंबई, दि. १२ (पीसीबी) :  महाराष्ट्रात भाजपचे काही दोन-चार प्रमुख नेते आहेत. ते वाहवत गेल्यावर त्यांना ठिकाणावर आणाव लागतं. हे विधान भाजपच्याच किरीट सोमय्या यांनी केले आहे. निवडणूक प्रचार समितीत न मागता नियुक्ती केल्यानं सोमय्या नाराज आहेत. सोमय्यांच्या त्या नाराजीचा रोख फडणवीस आणि बावनकुळेंकडे असल्याचं दिसंत आहे. भाजपच्या निवडणूक प्रचार समितीत दिलेलं स्थान नाकारणाऱ्या किरीट सोमय्यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांवरच निशाणा साधल्याची चर्चा आहे. प्रचार समितीत पद देवून बावनकुळे-फडणवीसांना माझ्यामागे शेपूट लावायचं होतं. 2018 ला ठाकरे-शाहांच्या पत्रकार परिषदेतून मला फडणवीसांनी बाहेर जायला सांगितलं. असं तब्बल 6 वर्षानंतर किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

जेव्हा अखंड शिवसेना आणि भाजपची युती होती., तेव्हापासूनच शिवसेनेचा किरीट सोमय्यांना तीव्र विरोध होता. 2019 ला ईशान्य मुंबई लोकसभेतून किरीट सोमय्या इच्छूक होते, पण जर सोमय्यांना भाजपनं तिकीट दिलं तर युतीत असूनही त्यांना पाडण्याची भूमिका ठाकरेंनी घेतली…अखेर भाजपला सोमय्यांऐवजी मनोज कोटकांना तिकीट द्यावं लागलं. पुढे मविआ स्थापन होऊन 2 वर्षात शिवसेनेचे दोन गट पडले. भाजपची अधिकृतपणे ठाकरेंच्या शिवसेनेशी फारखत झाली.

मविआ काळात किरीट सोमय्यांनी मुख्यत्वे ठाकरेंच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरु टार्गेट केलं. मात्र कालांतरानं त्यापैकीच अनेक नेते पुन्हा भाजपसोबत सत्तेत आले. यावरुन सोमय्यांची गोची झाल्यानंतर आपण फडणवीसांच्याच आदेशानं ठाकरेंविरोधात आरोप केले, असं स्वतः सोमय्यांनीच सांगितलं.

थेट बोलत नसले तरी इतक्या लोकांशी वैर घेवूनही पक्षानं योग्य पद न दिल्याची खंत सोमय्यांच्या बोलण्यात दिसते. भ्रष्टाचाराविरोधात सामान्यांच्या न्यायासाठी हातोडा आंदोलन करणाऱ्या सोमय्यांना स्वतःवरच्याच कथित अन्यायावर बोलायला ६ वर्ष का लागली? 2018 ला फडणवीसांनी आपल्याला पत्रकार परिषदेतून बाहेर जायला सांगितलं होतं. हे सांगण्यासाठी त्यांनी आत्ताचीच वेळ का निवडली. हे प्रश्न अनुत्तरित आहेत.

आपल्याला न विचारता नेमणूक हा अपमान आहे. पुन्हा असं करु नका असं खरमरीत पत्र सोमय्यांनी भाजपला लिहिलं., यावर विचारणा केल्यावर सोमय्या म्हणाले की., कधी-कधी महाराष्ट्र भाजपचे जे प्रमुख 2-4 नेते आहेत, त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्या यासाठी त्यांना आम्हाला जागं करावं लागतं. ते नेते जरा वाहवत जातात किंवा भरकटतात. त्यांना ठिकाणावर आणायचं असतं. तेच काम मी काल केलं. असा अपमानाचा अधिकार ना फडणवीसांना आहे, ना ही बावनकुळेंना…

महत्वाचं म्हणजे भाजपनंच आरोप केलेल्या नेत्यांना सत्तेची मोठ-मोठी पद देवून सोबत बसवलं. यावरही सोमय्यांनी कबुली दिली आहे. तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले., तेच बहुतांश नेते भाजपसोबत सत्तेत आहेत. यावर सोमय्या म्हणाले, हे खरंय…त्यावर जनता कायम प्रश्न करते. लोकसभेला विकास हवा होता, त्यासाठी आम्हाला तडजोड करावी लागली. त्या तडजोडीची किंमत आम्ही लोकसभेला मोजली

तिकडे प्रचार समितीत स्थान न मिळाल्यानं प्रसाद लाडांच्याही नाराजीची चर्चा आहे. पण राजकारणात पद महत्वाचं नसतं.असं सांगतानाच फडणवीसांनी आपल्यासाठी दुसरा विचार करुन ठेवला असेल, असंही प्रसाद लाड म्हणाले.