ठाकरे ब्रँन्ड साठी उध्दव आणि राज एकत्र येणार?

0
56

मुंबई,दि . १८ ( पीसीबी ) : गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा जोरात सुरु आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरेंची साद, त्याला अवघ्या काही तासात शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद, त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलेली सकारात्मक विधानं पाहता ठाकरे बंधूंकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे आता ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र येणार का, ते पाहणं महत्त्वाचं आहे. मनसेसोबतच्या संभाव्य युतीसंदर्भात आज उद्धव ठाकरेंनी मुंबईतील त्यांच्या माजी नगरसेवकांकडे विचारणा केली. मुंबई महापालिकेतील पक्षाच्या माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक झाली. त्यावेळी ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली.

मनसे सोबत युती करायची की नाही, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांची माजी नगरसेवकांकडे केली. त्यावर युती केली तर फायदाच होईल, असा माजी नगरसेवकांचा सूर होता. मुंबईत युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याची कबुली माजी नगरसेवकांनी ठाकरेंसमोर दिली. मुंबई महानगर पालिकेसाठी आपल्याला पालिकेसाठी ज्या पक्षासोबत युती करायची, त्याबद्दल तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेईन, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना दिलं.

तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात. येत्या काळात अनेक बैठका घ्यायच्या आहेत. माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन येथे येऊन सामान्यांचे प्रश्न सोडवावेत. शिवसेना भवनात निवडणूक कार्यालय उघडणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. येत्या ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत निवडणूक लागू शकते असा अंदाज उद्धव ठाकरेंनी बैठकीत व्यक्त केला.

मागील दोन महिन्यांपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीसंदर्भात चर्चा सुरु आहे. २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली. त्यात उद्धव ठाकरेंचे ८४ आणि राज ठाकरेंचे ७ शिलेदार विजयी झाले. २०२२ मध्ये शिवसेनेत पक्षाच्या इतिहासातील सगळ्यात मोठं बंड झालं. गेल्या ३ वर्षांत मुंबईतील निम्म्या नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या पक्षाची वाट धरली आहे. त्यामुळे ठाकरेंचा पक्ष कमकुवत झाला आहे. तर दुसरीकडे राज यांच्या पक्षाची ताकदही कमी झालेली आहे.