ठाकरे-फडणवीस भेट बातमीने खळबळ

0
38

मुंबई, दि. 21 (पीसीबी) : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा काँग्रेसमधील सूत्रांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचे दिसत असतानाच मविआला भेगा पडताना दिसत आहेत. याआधीही वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याने ठाकरे-फडणवीस यांची मातोश्रीवर भेट झाल्याचा दावा केला होता.

राऊत-शाह, ठाकरे-फडणवीस भेटीची चर्चा
उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा त्यांच्या भेटीनंतर आल्याचं काँग्रेसमधील सूत्रांचं म्हणणं आहे. ठाकरेंच्या आक्रमक बाण्याने काँग्रेसनेही स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचं चित्र आहे. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं काँग्रेसमधील सूत्रांचं म्हणणं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. भाजप ठाकरेंबाबत ‘बिहार पॅटर्न’ राबवण्याची भीती काँग्रेसला सतावत आहे. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने यासंदर्भात बातमी दिली आहे.

जागावाटपावरुन रस्सीखेच
काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जागावाटपावरुन तिढा असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. आधी संजय राऊत यांनी नाना पटोलेंसोबत चर्चेत सहभागी न होण्याचा पवित्रा घेतला होता. तर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषद नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मविआमध्ये तडे जाताना दिसले होते. नंतर राऊतांनी नरमाईची भूमिका घेतली असली, तरी फूटीची नांदी झाल्याची चर्चा होती.