अहमदनगर, दि. १२ (पीसीबी) : ‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:ला जाणता राजा समजणाऱ्या ज्येष्ठ नेत्याच्या इशाऱ्यावर कठपुतलीसारखे नाचतात. आता सरकार गेले, दोघांचेही पक्ष गेले. दोघेही एकमेकांना सल्ले देतात. सल्ले देता-घेता दोघांचेही वाटोळे झाले. आता शिल्लक काय राहिले?’, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर विखे पाटील बोलत होते.
विखे म्हणाले, ठाकरे कधीच मंत्रालयात, विधानसभा अध्यक्षांसमोर गेले नाहीत. आमची शिवसेना खरी असल्याचा दावा ते करीत होते. त्यांना आपला पक्ष वाचवता आला नाही. ४० आमदार सोडून जातात ही छोटी घटना नाही. तरीही ते कठपुतलीसारखे नाचत राहिले. रोज सकाळी टीव्ही लावला की, नको त्याचे तोंड पाहावे लागते. त्यांच्या या वाचाळपणामुळे ठाकरेंच्या सेनेची अब्रू गेली आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यांमुळे उरली सुरलेली ठाकरेंची सेना देखील संपू लागली आहे, असे म्हणत विखे पाटील यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता टीका केली.
निकालावर विखे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आता राज्यातील महायुती सरकार आणखी मजबुतीने काम करील. रोज नवीन एक ज्योतिषी येऊन सांगायचा की, हे सरकार पडणार, या तारखेला पडणार, त्या तारखेला पडणार, पण तसे काहीच झाले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे हे आहेत, यावर या निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान तलाठी भरतीमध्ये ३० लाख रुपये घेतल्याचे बेछूट आरोप करणारे आमदार रोहित पवार यांनी सरकारची व संबंधित विभागांची बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई निश्चित केली जाणार आहे. याबाबत कायदेशीर मत मागवले असल्याचेही विखे पाटील म्हणाले आहेत.