ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

0
179

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) : निवडणूक आयोगानं शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली, यामध्ये कोर्टानं ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. त्यानुसार, ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह ही सुनावणी प्रलंबित असेपर्यंत वापरता येणार आहे.

ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत यांनी मुद्दा उपस्थित केला की, “निवडणूक आयोगानं आम्हाला असं सांगितलं आहे की जोपर्यंत पोटनिवडणूक चालू आहे, म्हणजेच २६ फेब्रुवारीपर्यंतच तुम्हाला मशाल हे चिन्ह आणि तुमचं नाव मिळू शकेल” पण सुप्रीम कोर्टात सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरु असल्यानं ती संपेपर्यंत तरी आम्हाला चिन्ह आणि नाव वापरण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी अॅड. कामत यांनी केली.

निवडणूय आयोगाचा निर्णय ‘जैसे थे’

अॅड. कामत यांच्या या मागणीवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी यावर होकार दर्शवला. तसेच यासंदर्भात आदेश दिला की, दोन आठवड्यांनंतर यावर सुनावणी होईल. त्यामुळं पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाचे जे आदेश आहेत त्यामध्ये ठाकरे गटाला काही सुरक्षा दिली जाईल. म्हणजेच काही अटींसह कोर्टानं निवडणूक आयोगाचा निर्णय ‘जैसे थे’ असाच ठेवला आहे.

व्हिप निघणार नाही

त्यामुळं आता या काळात शिवसेनेकडून कोणताही व्हिप काढला जाणार नाही. म्हणजेच शिवसेनेच्या व्हिपमुळं ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार नाहीत. तसेच ठाकरे गटाचं मशाल हे चिन्ह २६ फेब्रुवारीनंतरही सुप्रीम कोर्टाचा पुढचा निर्णय येईपर्यंत हे त्यांच्याकडं कायम राहिलं. तसेच सरन्यायाधीश हे प्रकरण देखील स्वतःच्या अधिकारात ऐकणार आहे.