मुंबई, दि. ११(पीसीबी): शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देतांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय, त्यांनी शिंदे गटाचे भरत गोगावले यांचा व्हीप वैध असल्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं आता ठाकरे गटाच्या आमदारांना गोगावलेंचा व्हीप पाळावा लागेल, अशी चर्चा आहे. दरम्यान, यावर आता खुद्द राहुल नार्वेकरांनी भाष्य केलं. ठाकरे गटाला भरत गोगावलेंचा व्हीप लागू असणार असं त्यांनी स्पष्ट केलं.
आज एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नार्वेकर म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने आधी राजकीय पक्ष कोणता हे ठरवून प्रतोद कोणता हे ठरवावं, अशा गाईडलाईन्स दिल्या. कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स नुसारच निकाल दिला. आधी राजकीय पक्ष ठरवला. राजकीय पक्ष ठरवल्यानंतर प्रतोद ठरवला. राजकीय पक्ष निवडतांना एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी ठरली. त्यामुळं भरत गोगावलेंची निवड वैध ठरवली. सध्या विधानसभआ अध्यक्षांच्या समोर महाराष्ट्र विधिमंडळ गटांपैकी फक्त शिवसेना विधिमंडळ गट अस्तित्वात आहे. एका पक्षात दोन व्हिप असू शकत नाहीत. ज्यांची मी व्हीप म्हणून नियुक्ती केली. त्यांचा व्हीप सर्वांना लागू होईल, असं नार्वेकर म्हणाले. थोडक्यात गोगवले यांचा व्हीप आता ठाकरे गटावरही पाळणं बंधनकारण असणार आहे.
ठाकरेंच्या आमदारांनी नक्की कुठे बसायचं? या प्रश्नावराही नार्वेकरांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या बरोबर जे आमदार आहेत, त्यांना जागा नियुक्त करून दिली आहे. त्यांना दिलेल्या जागेवरच त्यांना बसावं लागे. प्रत्येकाच्या जागा निश्चित झाल्या आहेत. माझ्या मते, सध्या शिवसेना विधीमंडळ पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे जर कोणाला वेगळी भूमिका घ्यायची असेल, तर त्याबाबतचा निर्णय त्यांचा असेल आणि होणाऱ्या परिणामांना ते स्वतः जबाबदार असतील, असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. तर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. नार्वेकरांनी नीचपणाचा कळस गाठला आहे. आमची घटना अवैध असेल तर आमचे आमदार पात्र कसे? असा सवाल त्यांनी केला. नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला. ते कोर्टालाही जुमानत नाहीत. त्यामुळं त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचं ठाकरे म्हणाले.











































