ठाकरे गटाचे कुडाळचे उमेदवार वैभव नाईक गडगंज

0
43

कुडाळ, दि. 25 (पीसीबी) : कुडाळ विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. वैभव नाईक हे कुडाळमधून सलग दोन टर्मपासून आमदार आहेत. 2014 साली वैभव नाईक हे जायंट किलर ठरले होते. त्यांनी सिंधुदुर्गातील दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 साली सुद्धा त्यांनी सहज विजय मिळवला. आता तिसऱ्यांदा 2024 साली ते पुन्हा रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर निलेश राणे यांचं आव्हान आहे. नुकताच निलेश राणे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. वैभव नाईक यंदा विजयाची हॅट्ट्रिक करणार का? हा प्रश्न आहे. त्यांचा मार्ग तसा कठीणच आहे. कारण लोकसभा निवडणुकीत कुडाळ विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना 26 हजारांच मताधिक्क्य मिळालं होतं.

कुडाळ आणि मालवण हे दोन तालुके मिळून कुडाळ विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. वैभव नाईक यांनी कुडाळमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. निवडणूक अर्ज दाखल करताना वैभव नाईक यांनी जंगम व स्थावर अशी एकूण 32 कोटी 58 लाख 32 हजार 599 रूपयाची संपत्ती नमूद केली आहे. त्यांच्यावर जिल्ह्यातील तीन पोलिस ठाण्यात पाच फौजदारी खटले प्रलंबित आहेत. अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. गुरुवारी या प्रक्रियेतील शुभारंभ आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. दाखल केलेल्या अर्जात त्यांनी आपल्या स्थावर व जंगल मालमत्तेचे विवरण दाखवले आहे. यानुसार जंगम मालमत्तेमध्ये त्यांनी स्वतःच्या नावे 7 कोटी 31 लाख 2 हजार 215 रूपये तर पत्नीच्या नावे 3 कोटी 92 लाख 83 हजार 84 रूपये तर सामायिक मालमत्तेपैकी 9 लाख 86 हजार 754 रूपये एवढ्या मालमत्तेचे विवरण दाखवले आहे.

संपत्ती किती?

यामध्ये फॉर्च्यूनर कार, स्कॉर्पिओ, जेसीबी या मालमत्तेचे 43 लाख 30 हजार 924 रूपये त्यांच्याकडे स्वतःकडे 281 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 22 लाख 62 हजार 858 रूपये तर पत्नीकडे ४११ ग्रॅम सोने असून त्याची किंमत 34 लाख 97 हजार 122 रुपये आहे. त्यांना पत्नी व स्वतःच्या नावाने 91 लाख 70 हजार 381 रूपये कर्ज आहे, तर स्थावर मालमत्तेमध्ये स्वतःच्या नावे शेतजमीन, घर अशा स्वरूपाच्या मालमत्तेचे 11 कोटी 39 लाख 80 हजार 300 रू तर पत्नीच्या नावे 2 कोटी 52 लाख 51 हजार, तर सामायिक मालमत्तेत 7 कोटी 60 लाख रुपये एवढी मालमत्ता आहे. आमदार वैभव नाईक यांच्यावर एकूण पाच प्रलंबित फौजदारी खटले आहेत. यामध्ये कुडाळ पोलीस स्टेशन येथे 3 कणकवली पोलीस ठाण्यात 1 तर मालवण पोलीस ठाण्यात एक अशा 5 फौजदारी खटल्यांचा समावेश आहे अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.