ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वाद पराकोटीला; दसरा मेळाव्यात सामंजस्याची भूमिका घ्यावी – अजित पवार

0
228

पिंपरी दि. ५ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतून बाहेर पडून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्यातील वाद पराकोटीला गेले आहेत. पण, दोघांनीही दसरा मेळाव्यात सामंजस्याची भूमिका घ्यावी. महाराष्ट्राच्या परंपरेला बाधा येणार नाही, डाग लागणार नाही, कमीपणा येणार नाही अशा पद्धतीने वागावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाकरे आणि शिंदे यांना दिला आहे.

चिंचवडमधील थेरगाव येथे ‘संवाद सोसायटी धारकांशी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघातील सोसायटी रहिवाशांशी पवार यांनी आज(बुधवारी) संवाद साधला. स्थानिक पातळीवर भेडसावणाऱ्या समस्यांविषयी रहिवाशांकडून माहिती घेतली; त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा केली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही सामंजस्याची भूमिका घ्यावी. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा , आपली भूमिका जनतेसमोर मांडण्याचा अधिकार आहे. पण, लोकशाहित काही परंपरा असतात, त्या जपाव्यात. कोणाचाही अनादर करू नये. महाराष्ट्राच्या परंपरेला बाधा येणार नाही, डाग लागणार नाही, कमीपणा येणार नाही अशा पद्धतीने वागावे. ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वाद मिटतील का? असे विचारले असता पवार म्हणाले, दोघांतील वाद पराकोटीला गेले आहेत. त्यात पुढाकार कोणी घ्यायचा हा प्रश्न असून शब्दाने शब्द वाढत जातो. जसे दिवस पुढे जातील तशी कटुता कमी होईल. जनतेसमोर जातील.

आता मुंबईतील पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष राहील. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणूक निकालावर लक्ष असेल. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार की गोठवणार का? गोठवले तर दोघे दुसरे कोणते चिन्ह घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील या घडामोडींमुळे महाराष्ट्र अस्थिर होणार नाही. पण, सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या वाढत्या महागाई, बेरोजगारीकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही पवार यांनी बोलून दाखवली.