ठाकरेंप्रमाणे आता पवार कुटुंबही एकत्र येण्याची जोरदार चर्चाशरद पवार-अजित पवार एकत्र येणार?

0
18

ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेनंतर आता पवार कुटुंबातही जुळवणूक होण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे याचे संकेत स्वतः पवार घराण्यातीलच एक बडे नेते रोहित पवार यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी (X Platform) एक्स या सोशल मीडियावरून आपले विचार मांडताना “सर्व कुटुंबांनी एकत्र यायला हवं,” अशी भावना व्यक्त केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये थेट अजित पवार यांना टॅग केलं नाही. मात्र, या ट्वीटने आता वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीनंतरच ही प्रतिक्रिया येत असल्यामुळे याला राजकीय वजन प्राप्त झालं आहे.

त्यांनी लिहिलं की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चा आणि त्यातून उमटणारी सकारात्मकता पाहून असं वाटतं की, आता प्रत्येक कुटुंबानं अशा मोठ्या हेतूने एकत्र यायला हवं. भांडणं आणि मतभेद क्षणिक असतात, पण महाराष्ट्राचं भवितव्य मोठं आहे.”

रोहित पवार हे शरद पवार गटाचे प्रमुख युवा नेतृत्व मानले जातात. गेल्या वर्षभरात अजित पवार गट आणि शरद पवार गटात झालेल्या फूटीनंतर दोन्ही गटांमध्ये राजकीय अंतर वाढलं आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांची ही पोस्ट मोठा संदेश देणारी ठरू शकते.
राजकीय विश्लेषकांच्या मते, जसे ठाकरे कुटुंबात भूतकाळ विसरून पुढे जाण्याचे संकेत दिसत आहेत, तसाच विचार पवार कुटुंबातही सुरू झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूकंपसदृश घटना घडू शकते.