ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा दणका, सुलभा उबाळेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

0
4

मुंबई, दि. १२ – ठाकरेंच्या शिवसेनेची गळती थांबायचे नाव घेत नाही. शिवसेनेचा पिंपरी चिंचवड शहरातील अभ्यासू, निर्भीड, आक्रमक चेहरा म्हणून परिचित असलेल्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी अखेर उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र केला आहे. तीन महिन्यांपासून त्यांच्या पक्षांतराची चर्चा होती. उपमुख्यमंत्री एकनथ शिंदे यांच्या उपस्थितीत असंख्य समर्थकांसह आज सायंकाळी त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. अत्यंत कठोर अंतःकरणाने विकास कामे होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या बरोबर राहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संघटन शहरात मजबूत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेत १९९७ च्या निवडणुकित सर्वसाधारण जागेवर त्या शिवसेनेकडून नगरसेविका म्हणून प्रथम विजयी झाल्या. तीन वेळा महापालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी कारकिर्द गाजवली. विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला सळो की पळो केले. महापालिका सभागृहातील अत्यंत अभ्यासू आणि आक्रमक नगरसेविका म्हणून त्यांचा दबदबा कायम राहिला.
हवेली तालुक्याचे विभाजनानंतर नव्याने निर्माण झालेल्या भोसरी विधानसभा मतदारंघातून तत्कालिन आमदार विलास लांडे यांच्याशी त्यांनी अत्यंत चुरशीची लढत दिली आणि अवघ्या १२०० मतांनी पराभव झाला होता. पुढे २०१४ मध्ये त्यांना पुन्हा शिवसेनेने उमेदवारी दिली होती. दोन वेळा त्यांचा पराभव झाला मात्र, शिवसेनेची बांधीलकी कायम राखली.
यमुनानगर महिला मंडळ, दामिनी ब्रिगेड, तसेच बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभे केले. यमुनानगर परिसरातील खेळाचे मैदान, जलतरण तलाव उद्यान, स्केटींग ग्राऊंडसह अनेक मोठे प्रकल्प राबविले. विशेष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे, मीनाताई ठाकरे, बाळासाहेब ठाकरे अशी सर्व ठाकरे कुटुंबाची नावे प्रकल्पांना दिली. शिवसेनेचा सलग तीस वर्षांचा सलोखा संपवून सुलभा उबाळे यांनी शिंदेंच्या बरोबर जाणे पसंत केल्याने शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो.