रत्नागिरी , दि. २५ – रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. कारण आज रत्नागिरीत शंभर-दोनशे नाहीतर तब्बल साडेचारशे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश कऱणार आहेत. मंत्री उदय सामंत यांच्याकडून ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडण्यात आल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी काल केलेल्या दाव्यानंतर रत्नागिरीमध्ये तशा हालचाली सुरू असल्याचे पाहायला मिळतेय. आज रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजल्यापासून तालुका प्रमुखांपासून ते उपसंरपंचापर्यंतचा पक्षप्रवेश आज होत आहे. उबाठाला रामराम करत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय या साडेचारशे कार्यकर्त्यांनी घेतला आहे.‘एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीपासून उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडायला सुरुवात होत आहे आणि त्याचा पहिला ट्रेलर तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल, असे म्हणत चार उबाठाचे आमदार, पाच काँग्रेसचे आमदार, तीन उबाठाचे खासदार, दहा माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होतायत, असा मोठा दावा उदय सामंत यांनी केला केला होता.