ठाकरेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख संजोग वाघेरेंची स्वगृही परतणारविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या स्वागताला

0
22

पिंपरी, दि. १ : माजी महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख संजोग वाघेरे आता पुन्हा अजितदादांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर वाघेरे यांची पावले पुन्हा स्वगृही परतण्याच्या दिशेने पडत आहेत. त्यांच्या पत्नी, महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषा वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीला अवर्जून हजेरी लावली. पाठोपाठ आता संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या स्वागताला हजेरी लावली. त्यामुळे वाघेरे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
माजी महापौर संजोग वाघेरे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. अनेक वर्षे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपदही भूषविले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पवार यांची साथ सोडून शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला. या पक्षाकडून त्यांनी मावळमधून लोकसभेची निवडणूक लढविली. पण, त्यांना अपयश आले. विधानसभा निवडणुकीनंतर वाघेरे स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यांची शिवसेनेच्या (ठाकरे) प्रभारी शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात बनसोडे यांचे स्वागत करण्यात आले. स्वागताला महायुतीमधील घटक पक्ष भाजप, शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी जाणे टाळले. मात्र, महाविकास आघाडी सोबत असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख वाघेरे यांनी आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे वाघेरे हे पुन्हा स्वगृही परतण्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत वाघेरे म्हणाले, ‘शहराला आमदार बनसोडे यांच्या माध्यमातून संविधानिक पद मिळाले आहे. त्यामुळे स्वागत करायला जाणे गैर नाही. माझी राजकीय भूमिका वेगळी आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणावर काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेसचे नेते दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहराची सूत्रे आली. सलग १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता महापालिकेवर होती. अजित पवार यांच्या कलानेच शहरातील संपूर्ण निर्णय होत असे. २०१७ मध्ये भाजपने पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मदतीने अजितदादांच्या गडाला सुरुंग लावला. महापालिकेतील सत्ता भाजपने खेचून घेतली.

विधानसभेचे उपाध्यक्ष पद शहराला देऊन अजित पवार यांनी बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच संघटना वाढविण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा स्वगृही घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.