इंदापूर, दि. २७ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभेसाठी उमेदवार देण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती. यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असून बारामती लोकसभेवर भाजपचा झेंडा फडकाविण्याचा ध्यास घेण्यात आला आहे. यासाठी व्यूहरचना आखण्यास भाजपने सुरूवात केली असून याचाच एक भाग म्हणून बारामती लोकसभेसाठी स्वतंत्र टीमची नियुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. शरद पवार यांची तीन टर्म खासदार असलेली कन्या सुप्रिया सुळे यांचा पराभव हे भाजपचे मिशन आहे. आजवरचे सर्व प्रयत्न फेल गेल्याने आता नवीन नावाचा शोध सुरू आहे. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्या पत्नी अंकिता यांचे नाव चर्चेत आले आहे. भाजपाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील यांची अंकिता ही कन्या आहे. बरोबर एक वर्षांपूर्वी ठाकरे आणि पाटील यांची सोयरिक झाली.
लोकसभा निवडणूक फेब्रुवारी अखेर किंवा मार्च पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष्य केंद्रीत केले असून कोणत्याही परिस्थितीत यावेळी शरद पवार यांना धडा शिकवायच्या तयारीत केंद्रातील नेते आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून समोर आले, मात्र मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना महायुतीची उमेदवारी दिल्यास बारामतीत दुसरे नाव पाहिजे म्हणून अंकिता पाटील-ठाकरे यांचे नाव पुढे आले आहे.
भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी अंकिता पाटील-ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त शोधून भावी खासदार
म्हणत फ्लेक्स, बँनर्स लावले जात आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या व भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील- ठाकरे यांचे इंदापूर तालुक्यामध्ये भावी खासदारचे फ्लेक्स झळकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ आहे. हे फ्लेक्स सोशल मीडियावर देखील चांगलेच व्हायरल होत असल्याने अंकिता पाटील- ठाकरे यांच्या नावाची चर्चा आता सुरु झाली आहे.
भाजपने यापूर्वीच अ फॉर अमेठी व बी फॉर बारामती अशी घोषणा करुन 2024 च्या लोकसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प केला आहे. यासाठी मिशन बारामती सुरु करण्यात आले असून बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीतर्फे महादेव जानकर व 2019 च्या निवडणूकीमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांनी निवडणूक लढवली होती. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणूकीची गणिते बदलली आहेत.
काही महिन्यांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत युती केल्याने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप व मित्र पक्षाची ताकद वाढणार आहे. सध्या अंकिता पाटील-ठाकरे यांच्याकडे भाजप युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ही जबाबदारी स्वीकारून अंकिता यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच युवकांचे संघटन सुरु आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचा जास्त प्रभाव आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान द्यायचे झाल्यास त्याच तोडीचा उमेदवार देणे गरजेचे आहे. त्यामुळे अंकिता यांना ताकद देण्यास भाजपने सुरवात केली आहे. आगामी लोकसभेच्या निवडणूकीसाठी यापूर्वी अंकिता पाटील-ठाकरे यांच्या नावाची चर्चा केवळ दबक्या आवाजामध्ये सुरु होती. मात्र, आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भावी खासदार असे फ्लेक्स लावण्यात आले असून सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांनी भावी खासदार अशा पोस्ट तयार केलेल्या आहेत.