ठाकरेंची शिवसेना म्हणते, अण्णा आता आंदोलन पुकारा…!

0
256

मुंबई,दि.२५(पीसीबी) – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारला होता. आताही अण्णांनी आंदोलन पुकारावं. मोदी सरकारच्या कामांवर बोलावं, असं आवाहन सामनाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी केलं आहे. अण्णा हजारे यांनी मणिपूरच्या दुर्घटनेवर दोन दिवसांआधी भाष्य केलं. त्यावरून संजय राऊतांनी अण्णांना पुन्हा आंदोलन छेडण्याचं आवाहन केलं आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी ही साद घातली आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा
काँग्रेस राजवटीत अण्णांनी भ्रष्टाचाराविरोधात मशाल पेटवली तेव्हा सभ्य आणि सुसंस्कृत मनमोहनसिंग हे देशाचे पंतप्रधान होते. व त्यांनी आघाडीचे सरकार मोठय़ा कसरतीने चालवले होते. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर उभारलेल्या लढय़ात तेव्हा देश अण्णांच्या मागे उभा राहिला . ‘ अण्णा , आगे बढो ‘ अशा घोषणा तेव्हा तरुणांनी दिल्या . अण्णांचे आंदोलन हे भ्रष्टाचाराविरुद्ध , हुकूमशाहीविरुद्ध होते व आज पुन्हा एकदा त्याच मशाली पेटवण्याची गरज देशात निर्माण झाली आहे . मणिपूर प्रकरणात अण्णा जागे आहेत हे दिसले . म्हणून आशेचे दिवे पुन्हा पेटले , इतकेच ! अण्णा , हाती पुन्हा एकदा मशाल घ्या ! पेटवा ती मशाल !

श्री. अण्णा हजारे यांनी अचानक अशी मागणी केली की, मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढणाऱ्यांना फाशी द्यावी. मणिपूरचे प्रकरण गंभीर आहे व सरकारने त्याबाबत चालढकल करू नये, असे अण्णांचे म्हणणे आहे. अण्णांचे काहीच चुकले नाही. अण्णा जागे आहेत व त्यांचे देशातील घडामोडींवर लक्ष आहे हे यामुळे दिसले. मणिपूरच्या नग्नसत्यावर सारे जग थुंकते आहे; पण त्याची पर्वा ना आपल्या पंतप्रधान मोदींना, ना त्यांच्या बकध्यान करणाऱ्या सरकारला. त्यामुळे इतक्या दिवसांनी जागे होऊन अण्णांनी काय मिळवले? महिलांची अब्रू लुटणाऱ्या नराधमांना फाशी द्या ही सगळय़ांचीच मागणी आहे. या अपराध्यांकडे डोळेझाक करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना पदमुक्त करावे, निदान मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना तरी घरी पाठवा, अशी मागणी अण्णांनी केली असती तर ते अधिक योग्य ठरले असते.

महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या आरोपींना अटक झाली, पण त्या आरोपींना शिक्षा होईल काय? हा प्रश्नच आहे. जशी भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा होईल याची गॅरंटी नाही तशी या देशात बलात्कारी व महिलांची नग्न धिंड काढणाऱ्यांना शासन होईलच याची गॅरंटी नाही. महिला कुस्तीगिरांच्या यौन शोषण प्रकरणात वेगळे काय घडले? मणिपूरचे प्रकरण तसेच थंड केले जाईल. मणिपुरातील ज्या आरोपींनी महिलांची नग्न धिंड काढली त्यांचे खटले मणिपूरच्या बाहेर चालवायला हवेत. तरच या आरोपींना शासन होईल, पण न्यायालयाने शिक्षा ठोठावूनही आरोपींना शिक्षा भोगावीच लागेल याची गॅरंटी नाही.

गुजरातच्या बिल्किस बानो प्रकरणातील सर्व खुनी आणि बलात्कारी लोकांच्या शिक्षा माफ करून त्यांना पुन्हा भाजपच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले गेलेच आहे. देशभरातील भ्रष्टाचारी, बलात्कारी, विनयभंगवाले यांना भाजपात प्रवेश दिला जातोय. अण्णा हजारे यांनी आवाज उठवायचा आहे तो इथे; पण सभोवती अन्यायाची व भ्रष्टाचाराची आग लागली असताना अण्णा गप्प होते व आहेत.

अण्णांच्याच कृपेने दिल्लीतील आजचे मोदींचे सरकार स्थानापन्न झाले. अण्णांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर जंतर मंतर रोड, रामलीला मैदानात उपोषणाचा बार उडवून देशाला जागे केले व त्याच जागे झालेल्या मतदारांनी काँग्रेसचा पराभव केला व भाजपास सत्तेत आणले; पण भाजप सरकारचा कारभार असा चालला आहे की, आधीची काँग्रेसची राजवट ही नीतिमान व चारित्र्यवान वाटावी. अण्णांनी भाजपचे सरकार बसवले व ते राळेगणसिद्धीत जाऊन बसले ते बसलेच.

महाराष्ट्रात ‘युती’चे सरकार असताना मंत्र्यांच्या विरोधात उपोषण करणारे हेच अण्णा आज दादा भुसे, अब्दुल सत्तार, मुश्रीफ, प्रफुल पटेल, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल कुल अशांच्या घोटाळय़ांची दखल घेत नाहीत व एकदम मणिपुरातील हिंसाचारावर बोलू लागतात़ पंतप्रधान मोदी हे ज्याप्रमाणे राष्ट्रीय समस्यांचा त्याग करून विश्वगुरू झाले तसे आपल्या अण्णांचे झाले आहे काय? आसपासच्या भानगडीत पडायचे नाही. जगाची चिंता वाहावी असं त्यांनी ठरवले आहे की काय? काँग्रेस राजवटीत अण्णांनी भ्रष्टाचाराविरोधात मशाल पेटवली. मणिपूर प्रकरणात अण्णा जागे आहेत हे दिसले. म्हणून आशेचे दिवे पुन्हा पेटले, इतकेच! अण्णा, हाती पुन्हा एकदा मशाल घ्या! पेटवा ती मशाल!