ठाकरेंची शिवसेना महापालिका स्वबळावर लढणार…

0
39

मुंबई, दि. 27 (पीसीबी) : राज्यातील लोकसभा निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, या यशामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचा आत्मविश्वास बळावला. त्यातच, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीही आणि मजबूत महाविकास आघाडी बनल्याचे चित्रही दिसून आले. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपावेळी काही मतभेद काँग्रेस आणि शिवसेना पक्षात पाहायला मिळाले. मात्र, निवडणूक निकालानंतर अनेकांच्या भुवया उंचावतील असेच चित्र दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत तब्बल 30 जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतील विधानसभेला 288 पैकी केवळ 49 जागांवरच विजय मिळाला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी पुढील निवडणुकांना कसे सामोरे जाते हे पाहावे लागेल. त्यातच, शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या उमेदवारांच्या बैठकीत अनेकांनी पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत शिवसेना युबीटी नेते आणि माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनीही माहिती दिली.

विधानसभा निवडणुका लागल्यामुळे आता पुढील काही महिन्यातच महापालिका निवणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे, येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीत न लढता स्वतंत्र स्वबळावर लढल्या पाहिजेत, अशा प्रकारचा सूर शिवसेना ठाकरे गटातील काही पराभूत उमेदवारांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बोलवलेल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत ईव्हीएम गोंधळाच्या मुद्द्यासोबतच पराभूत उमेदवारांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा मुद्दा देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडला. महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवून फारसा फायदा विधानसभा निवडणुकीत झाला नसल्याचे काही पराभूत उमेदवारांचं म्हणणं आहे. त्यामुळे, त्यांनी आपल्या मनातील भावना उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या आहेत. मात्र, यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही, पक्षप्रमुखांनी केवळ त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. या चर्चेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होते का,असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

स्वबळावर लढावं ही कार्यकर्त्यांची भावना
शिवसेना पक्षातील काही लोकांचा सूर आहे की, आपण स्वतंत्र लढल पाहिजे. एक-दोन नाही तर अनेकांनी असं मत व्यक्त केल आहे. शिवसेनेने स्वतंत्र गेलं पाहिजे, शिवसेनेला सत्ता हवीय असं काही नाही. त्यामुळेच, कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याच्या भावना व्यक्त केल्याचे दानवे यांनी म्हटलं.