ठरले !!! वंचितचे प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवार

0
119

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सुत्र अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, त्याला आता चालना मिळाली आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचा या आघाडीत समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यादृष्टीने अॅड प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

यासंदर्भात नाशिकच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली. ‘वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असून, वंचित बहुजन आघाडीसुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे. लोकसभेच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.

अकोला लोकसभेची जागा परंपरेनुसार प्रकाश आंबेडकर लढतात आणि ती जागा त्यांनीच लढावी. यावर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. हा निर्णय राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण त्यातून आंबेडकरी जनता भाजपपासून लांब जाईल. महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारांची जनता ही कोणत्याही परिस्थितीत आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करून राज्य करणाऱ्या मोदींना पाठिंबा देणार नाही, असा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

‘लोकसभेबाबत आमच्या चर्चा मुंबईत होतात; पण काँग्रेसचे हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना दिल्लीत जावे लागते. आता शिंदे गट आणि अजित पवार गटाचे हायकमांडही दिल्लीत आहेत. शिंदे व अजित पवार गटाने 48 जागा लढवाव्यात, त्यांना त्यांची जागा कळेल,’ अशी टीका राऊत यांनी केली.

‘यांच्या गळ्यात दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे. मानेवर पट्टा असेल तर तो आजार आहे. असा आजार कुणालाही होऊ शकतो. अमित शाह देखील आजारी असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) या नेत्यांच्या गळ्यात सध्या दिल्लीश्वरांचा पट्टा आहे. यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा आहे. तो महाराष्ट्राला वेदना देणारा आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा बांधलाय. दिल्ली त्यांना खेळवतेय, असे संजय राऊत म्हणाले.