ठरलं…, मुंबईचा महापौर आमचाच बसणार – आशिष शेलार

0
357

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार यांनी अध्यक्षपदी नियुक्ती होताच शिवसेनेवर तोफ डागली. “मुंबई महापालिकेत आमचाच महापौर बसणार,” असा विश्वास शेलारांनी व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘शिंदे गट आणि आमचं ठरलं की यंदा मुंबई महापालिकेत बदल अटळ आहे,’ असे शेलार म्हणाले.

“मुंबई महापालिकेत २५ वर्ष केलेल्या भष्ट्राचाराबाबत शिवसेना पळ काढू शकत नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत दोन दशकं संघर्ष केला आहे. गेली दोन वर्षे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविरोधात आंदोलन करीत आहे. मुंबई महापालिकेत यंदाच्या निवडणुकीत भाजपलाच बहुमत मिळेल,” असे शेलार यांनी ठामपणे सांगितले. ‘खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. दादर येथे नवीन शिवसेना भवन होत असेल तर भाजपला त्याचा आनंदच आहे,’असे ते म्हणाले

“शिवसेनेनं मुंबई ही आमची जहागीर आहे, असे मानून मुंबईत भ्रष्टाचाराची बजबजपुरी केली आहे. मुंबईत रस्त्यावर खड्डे झाले आहेत. यातून शिवसेना हात झटकू शकत नाही. भ्रष्ट व्यवस्थेने भरलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तडीपार करू. आमचे टार्गेट आमचा महापौर असेल. राज्याचे नेतृत्व शिंदे आणि फडणवीस करतील त्यामुळं बाकी निर्णय ते घेतील,” असे शेलार म्हणाले.

“अजून सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. तीन महिने होऊ द्या मग आमचे 48 खासदार निवडून येतील, कुठल्याही मंचावर आणि कुठल्याही ठिकाणी आम्ही तुमचा सामना करायला तयार आहोत,” अशा शब्दात आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता शेलारांना टोला लगावला.

येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेलार यांच्या खांद्यावर भाजपनं मोठी जबाबदारी टाकली आहे. शेलार हे दुसऱ्यांदा मुंबईचे अध्यक्ष झाले आहेत. सुमारे २० वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यातून मुंबई महापालिका ताब्यात घेण्याची मोठे आवाहन आशिष शेलार यांच्यावर आहे. कॅबिनेट मंत्रीपदी शेलार यांना संधी दिली नसली तरी भाजपा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक पाहता मुंबई भाजपा अध्यक्षाची जबाबदारी दिली आहे.