शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना येणाऱ्या निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत ही जागा अजित पवार आपल्याकडे घेणार हे जवळपास निश्चित झाले होते. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर एक बैठक झाली. त्यामध्ये शिरूर लोकसभेची जागा महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, डॉ. कोल्हे यांना पाडण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील हेच एकमेव सक्षम उमेदवार असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आल्याने आता दोन दिवसांत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.
शिरूर लोकसभेसाठी २०१९ मध्ये डॉ. कोल्हे यांनी आढळराव यांचा अवघ्या ६० हजार मतांनी पराभव केला. सलग तीन टर्म मोठ्या मताधिक्याने जिंकलेल्या आढळराव पाटील यांना तो पराभव खूप लागला. अफाय जनसंपर्क, कामांची रेलचेल असूनही केवळ छत्रपती शिवाजीराजे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिकेतून भूमिका करणारे म्हणून डॉ. कोल्हे यांनी बाजी मारली. पाच वर्षांत त्यांचा संपर्क नसल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर होता. आता तोच धागा पकडून आढळराव पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. कोणत्याही परिस्थितीत बाजी जिंकायचीच असा निग्रह करून ते रिंगणात उतरलेत. त्यांच्या बरोबर भाजपचे भोसरीकर आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे पाटील यांची नावेसुध्दा इच्छुकांच्या यादीत आहेत. खुद्द मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून जागा राष्ट्रवादीला आणि उमेदवारी आढळराव यांना द्यायचा निर्णय केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटप निश्चित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी महायुतीत सहभागी असलेल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची एक बैठक मंगळवारी रात्री उशिरा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काही आमदार, खासदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तर काही पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे डॉ.कोल्हे हे शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार यांनी डॉ.कोल्हे हेच आमचे उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे. शिरूरमधून तीन टर्म प्रतिनिधित्व करणारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत त्यांच्याकडे गेलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे येथून निवडणूक लढविण्यास तीव्र इच्छुक आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून यासाठी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. शिरुरची जागा लढविणार असून विद्यमान खासदार डॉ.कोल्हे यांचा पराभव करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिलेल्या आढळराव पाटील यांना गेल्या आठवड्यात पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आल्याची टीका केली जात होती. म्हाडाचे अध्यक्षपद मिळाले असले तरी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे आढळराव पाटील यांनी जाहीर केले आहे. महायुतीतील ताण वाढला होता. परंतु वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत ही जागा राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.