- भाजप ४४, शिवसेना ३३, राष्ट्रवादी २३
दि . २४ ( पीसीबी ) – राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीच्या महामंडळ वाटपावर फॉर्म्युला ठरला असल्याची सूत्रांची माहिती आहे. संख्याबळाच्या आधारावर महामंडळांचं वाटप करण्यावर महायुतीतील तिनही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. महायुतीतील भारतीय जनता पक्षाला ४४, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ३३ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण २३ महामंडळ मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. समन्वय समितीमध्ये ४४, ३३ आणि २३ अशी महामंडळं वाटप करण्यात येणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर महायुतीतील मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांना सवाल केला असता त्यांनी त्यासंदर्भात त्यांच्यापर्यंत कोणतीच माहिती पोहोचली नसल्याचे सांगितले. पण येत्या महिन्याभरात महामंडळ महायुतीचा फॉर्म्युला ठरेल, असे उदय सामंत यांनी सांगितले.
हे वाटप स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांपूर्वी नाराज आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी केले जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सिडको (CIDCO) आणि म्हाडा (MHADA) यांसारख्या महत्त्वाच्या महामंडळांवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये अजूनही रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे.