– सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर डिसेंबर मध्ये कार्यक्रम
मुंबई, दि. १४ (पीसीबी) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकीय राजवटीला आता आठ महिने पूर्ण झाले आहेत. राज्यातील १८ महापालिका आणि दोन हजार १६४ नगरपालिका, नगरपंचायतींची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्याचे नियोजन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. आता येत्या गुरुवारी (ता. १७ नोव्हेंबर) होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची प्रतीक्षा आहे. प्रभागरचना व मतदार यादी यापूर्वीच अंतिम झाल्याने डिसेंबरमध्ये महापालिका, नगरपालिका निवडणूक जाहीर होईल.
जानेवारी-फेब्रुवारी २०२३ पूर्वी २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याचे नियोजन आयोगाकडून सुरु आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या अंदाजे २८ लाख विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरु असते. त्यावेळी निवडणुकीसाठी यंत्रणा अपुरी पडते आणि मतदान केंद्रांचीही अडचण निर्माण होते. कडक उन्हाळा आणि पुन्हा पावसाळा त्यामुळे त्या काळात निवडणूक घेणे अशक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर डिसेंबर २०२२ ते २० फेब्रुवारी २०२३ या ८५-९० दिवसांत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उरकून घेतल्या जाणार आहेत. मार्च २०२३ नंतर पुन्हा मुदत संपणाऱ्या दोन-तीन हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका होतील, असे ग्रामविकास विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीची निवडणूक १८ डिसेंबरला होणार आहे. त्याच दरम्यान, महापालिका, नगरपालिकांची पहिल्या टप्प्यात निवडणूक जाहीर होऊ शकते. जानेवारीअखेरीस फेब्रुवारीपूर्वी दुसऱ्या टप्प्यात मुदत संपलेल्या सर्वच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याचे नियोजन निवडणूक आयोगाकडून सुरु असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. आता केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर पहिला टप्पा जाहीर होईल, असेही सूत्रांनी सांगितले.
महाआघाडी होणार की स्वतंत्र लढणार ? –
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी झाली होती. महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक ही पदाधिकारी, कार्यकर्त्यांची असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच निवडणुकांबाबत भाष्य केलेले आहे. शिवसेनेत फूट पडून दोन गट तयार झाल्याने उद्धव ठाकरे यांना ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट भाजपसोबत हातमिळवणी करत निवडणुका लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे. बंडखोरीची शक्यता ध्यानात घेऊन महाविकास आघाडीतील पक्ष मात्र, स्वतंत्रपणे निवडणूका लढवतील, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला नामोहरम करण्यासाठी महाविकास आघाडीची व्युहरचना सुरू असल्याचे सांगण्यात आले. शिवसेना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपचे टार्गेट फक्त मुंबई महापालिका असल्याने कोणत्याही परिस्थितीत तो डाव हाणून पाडायचा असे महाआघाडीच्या नेत्यांनी ठरविले आहे.