ठरलं तर…लोकसभेला महेश लांडगे, विधानसभेला अजित गव्हाणे

0
744

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावर चाचपाणी
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप राज्य सरकारमध्ये एकत्र आल्याने आता पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणातही नवीन समिकरणे तयार होत आहेत. परस्परांचे कट्टर शत्रू समजले जाणारे आगामी निवडणुकीपर्यंत दिलदार मित्र झाल्याचे पहायला मिळणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिरूर लोकसभा जागेसाठी भाजपकडून आमदार महेश लांडगे यांना, तर भोसरी विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून या पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना संधी देण्यासाठी चाचपणी सूरू आहे. दरम्यान, लोकसभा उमेदवारी गृहीत धरून आमदार लांडगे यांनी थेट जुन्नर, मंचर, राजगुरूनगर शहरात बैठका सुरू केल्याने आता भोसरी विधानसभेसाठी गव्हाणे हेच या युतीचे आगामी उमेदवार असणार, हे जवळपास निश्चित आहे.
महाराष्ट्रात भाजपच्या बरोबर शिंदेंची शिवसेना वर्षभर सत्तेत आहे. गेल्या रविवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० सहकारी आमदारांसह थेट भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय केल्याने मोठी खळबळ उडाली. आगामी काळात लोकसभा, विधानसभा, महापालिका आम्ही भाजप, शिंदेंची शिवसेना यांच्या बरोबर युतीत लढणार असल्याचे स्वतः अजितदादा पवार यांनी जाहीर केले. नवीन समिकरणे कशी असतील किंवा कोण कोणत्या जागा लढविणार याबाबत तत्काळ चर्चा सुरू झाल्या. शहरात मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा, तर चिंचवड, पिंपरी आणि भोसरी हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्यावतीने तयारी करण्याचे फर्मान पक्षाकडून आल्याने आमदार महेश लांडगे यांनी तीन महिन्यांपासून हालचाली सुरू केल्या. या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणूनही आमदार लांडगे यांची नियुक्ती कऱण्यात आल्याने आगामी काळात त्यांनाच उमेदवारी मिळणार यावरही शिक्कामोर्तब झाले. स्वतः लांडगे यांनी तत्काळ कार्यकर्त्यांच्या बैठकांचा धडाका लावला. थेट जुन्नर, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण अशा महत्वाच्या शहरांतून गाठीभेटी त्यांनी सुरू केल्या. आमदार लांडगे यांच्या आगत स्वागताचे फलकसुध्दा संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात लावण्यात आले. ही जागा युतीमध्ये शिवसेनेकडे होती, पण आता ती भाजपलाच मिळावी म्हणून वरिष्ठ नेत्यांनी आग्रह धरला आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या आदेशानुसार विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचीच उमेदवारी जवळपास निश्चित जमजली जाते. आता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडे खेड तालुक्याचे आमदार दिलिप मोहिते आणि आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलिप वळसे पाटील हीच तगडी नावे आहेत. डॉ. कोल्हे यांचे आणि या दोन्ही आमदारांचे कधीच सूत जुळले नाही, आता तर ते शरद पवार यांच्या गोटातील राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. त्यामुळेच शिरूर लोकसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिंदेंची शिवसेना यांच्या वतीने आमदार लांडगे यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित समजले जाते. आमदार लांडगे यांनाही आगामी काळात खासदारकीत विशेष रस असल्याने त्यांची यंत्रणासुध्दा कामाला लागली आहे.
दरम्यान, आमदार लांडगे हे लोकसभा लढविणार असतील तर आता नवीन महायुतीमध्ये भोसरी विधानसभा जागेवर कोण लढणार हा पेच होता. भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांच्या वतीने या जागेसाठी अजित गव्हाणे हेच तगडे उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू आहे. शिंदे गटाची शिवसेना सहमत होईल आणि माजी अजित गव्हाणे यांना पाठिंबा देतील असे सांगण्यात आले.
राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार झाल्याने आगामी काळात दोन्ही लोकसभा आणि तीनही विधानसभांच्या जागा या राष्ट्रवादीकडेच राहतील यासाठी दादांचा आग्रह असणार आहे. त्यातच गव्हाणे यांनी शहराध्यक्षपदाचा पदभार घेतल्यापासून शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे दिसले. स्वतः अजित पवार हे त्यामुळेच गव्हाणे यांच्यावर जाम खूश आहेत. फाटाफुटीत माजी आमदार विलास लांडे यांच्यासह बहुतांश सर्व माजी नगरसेवकांनी अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे अजित पवार यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने आता अजितदादासुध्दा लक्ष देऊन आहेत. आगामी निवडणुकिचा भाग म्हणून अजितदादांनी महापालिकेतील प्रलंबीत प्रकऱणांवर ताबडतोब निर्णय घ्यायचे ठरवले असून तत्काळ एक विशेष बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व निर्णय आणि बैठकिचा फायदा संभाव्य उमेदवार म्हणून भोसरीतून गव्हाणे यांना होऊ शकतो.