ट्रेडिंग शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची 35 लाखांची फसवणूक

0
308

वाकड, दि. २२ (पीसीबी) – ट्रेडिंग शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून एका दाम्पत्याची 35 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. एका बनावट अॅपद्वारे गुंतवणुकीचा अभिलेख तयार करून ही फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 29 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीत कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली.

याप्रकरणी 44 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्यवस्थापक मीनाक्षी कपूर, आरव, लोपा शर्मिन काबीर, कुणाल, पूजा शर्मा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सोशल मिडीयावर ट्रेडिंग शेअर मार्केटची एक जाहिरात दिसली. त्यामध्ये चांगला नफा मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे फिर्यादी यांनी दिलेली लिंक ओपन केली. त्यांनतर फिर्यादी यांना एका व्हाटसअप ग्रुपमध्ये जॉईन करण्यात आले. तिथे आरोपींनी शेअर मार्केट मध्ये होणाऱ्या नफ्याबद्दल सांगून फिर्यादीस एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यामध्ये फिर्यादी यांनी 21 लाख 65 हजार आणि त्यांच्या पत्नीने 13 लाख 70 हजार असे एकूण 35 लाख 35 हजार रुपये गुंतवले. त्यानंतर त्यांनी गुंतवलेले पैसे काढण्यासाठी कंपनीच्या कस्टमर केअरला रिक्वेस्ट दिली असता ती रिक्वेस्ट कॅन्सल करण्यात आली. त्यांनतर फिर्यादीस कोणताही नफा अथवा त्यांनी गुंतवलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.