हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) – यु ट्यूबवरील व्हिडीओ लाईक करण्यास सांगून त्यानंतर ट्रेडिंगच्या बहाण्याने एका आयटी अभियंत्याची 16 लाख 84 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 11 एप्रिल रोजी टीसीएस कंपनी, हिंजवडी फेज तीन येथे घडली.
विश्वजित कुमार उपेंद्र झा (वय 32, रा. पुनावळे) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8008175610 या क्रमांकावरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ऑफिसमध्ये असताना त्यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला. ‘तुम्ही तुमच्या पगाराव्यतिरिक्त घरी बसल्या रिकाम्या वेळेत पैसे कमवू शकता’ असे आमिष दाखवून युट्यूबवरील व्हिडीओ लाईक करण्यास सांगितले. सुरुवातीला त्याचे 150 रुपये आरोपीने फिर्यादीस दिले. त्यानंतर फिर्यादीस टेलिग्रामवरील लिंक पाठवून ट्रेडिंगसाठी पैसे भरण्यास भाग पाडून त्यांची 16 लाख 84 हजार 700 रुपयांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.