ट्रॅव्हलर आग प्रकरणी चालकावर खुनाचा गुन्हा

0
6

हिंजवडी, दि. २१ पीसीबी – हिंजवडी येथे ट्रॅव्हलर बसला आग लागल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला. तर पाच कामगार जखमी झाले. या प्रकरणाचा उलगडा करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. ट्रॅव्हलर बस चालकानेच कट रचून कामगारांना ठार मारल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे चालकावर खुनाचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनार्दन निळकंठ हुंबर्डीकर (वय ५४, रा. वारजे, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दत्ता काळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जनार्दन याचे इतर कामगारांसोबत सतत भांडण होत होते. त्याचा राग त्याच्या मनात होता. तसेच त्याला चालकाच्या कामाव्यतिरिक्त अन्य कामे दिली होती. त्याचाही राग त्याच्या मनात होता. त्यामुळे त्याने कामगारांना धडा शिकवण्याचे ठरवले. कंपनीतील बेन्झीन केमिकल कापडावर टाकून त्याला आग लावून ते बसमध्ये टाकले. त्यामुळे बसमधील चार कामगार ठार झाले. तर पाच कामगार जखमी झाले. चालक जनार्दन देखील जखमी झाला आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनी तपास करीत हा घातपात असल्याचे उघडकीस आणले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.