ट्रक चालकाने केला साखरेच्या 60 पोत्यांचा अपहार

0
199

चाकण, दि. ८ (पीसीबी) – आंबेगाव येथून पनवेल येथे पोहोच करण्यासाठी भरलेल्या साखरेच्या 900 पोत्यांपैकी 60 पोत्यांचा ट्रक चालकाने अपहार केला. हा प्रकार मंगळवारी (दि. 5) रात्री दहा ते बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या कालावधीत खेड तालुक्यातील खालूंब्रे गावात घडला.

शरद वसंत बेळगे (वय 30, रा. अहमदनगर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमान हरिभाऊ झांभरे (रा. हिंगणी, ता. आष्टी, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनाथ ट्रान्सपोर्ट बारामती यांच्याकडून फिर्यादी यांनी साखर पोहोच करण्याची ऑर्डर घेतली. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथून 14 लाख 88 हजार 737 रुपये किमतीची 45 टन साखर 900 बॅगमधून भरून दिली. ही साखर पनवेल येथे पोहोच करायची होती. दरम्यान आरोपी ट्रक चालकाने खेड तालुक्यातील खालूंब्रे गावात ट्रकमधील 99 हजार 249 रुपये किमतीच्या साखरेच्या 60 बॅग आणि 19 हजार 200 रुपयांचे 200 लिटर डिझेल असा एकूण एक लाख 18 हजार 449 रुपयांचा अपहार केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.