ट्रकची तोडफोड करून लुटले द्रुतगती मार्गावरील घटना

0
197

शिरगाव, दि.५ (पीसीबी) -पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जात असताना एका कारने ट्रकला मागून कट मारला. त्यात कारचे नुकसान झाले. त्यावरून कार चालकाने ट्रक थांबवून ट्रक चालकाला मारहाण केली आणि ट्रक मधील एकाला जबरदस्तीने लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. ३) रात्री उर्से टोलनाक्याजवळ घडली.

शैलेशकुमार दयाशंकर पासवान (वय ३२, रा. शिकारपूर, जि. महाराजगंज, उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवनाथ किसन भोजने (वय ३८, रा. चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पासवान हे त्यांच्या ट्रकमध्ये फ्लिपकार्ड कंपनीचा माल भरून पुण्याच्या दिशेने येत होते. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास उर्से टोल नाक्याजवळ त्यांच्या ट्रकच्या मागून एक कार आली. कारने ट्रकला कट मारला. त्यात कारचा आरसा तुटला. कार चालकाने पुढे जाऊन पासवान यांचा ट्रक अडवला. ट्रकच्या काचांवर दगड मारून काचा फोडल्या. तसेच पासवान यांना मारहाण केली. ट्रकमध्ये बसलेले रोहताश कुमार राम स्वरूप पासवान यांना आरोपीने मारहाण करून त्यांच्या खिशातून २० हजार रुपये जबरदस्तीने काढून नेले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.