पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – एका मद्यधुंद ट्रक चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून भीषण अपघात घडवला. या अपघातात बोलेरो जीपमधील प्रवासी गंभीर जखमी झाले असून, ट्रक चालकाने पळून जाताना इतरही वाहनांना धडक दिली.
याप्रकरणी रामगीर गुदामगीर गोसावी (वय ४०, रा. ता. सिन्नर, जि. नाशिक) यांनी शुक्रवारी (दि. ३) आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी ट्रक चालक सोनू कैलाश पांडे (रा. सोहाना, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शुक्रवारी आपल्या बोलेरो गाडीने (MH 12 GK 4937) आळंदीवरून जेजुरीकडे जात होते. दरम्यान, धानोरे फाटा येथे समोरून येणाऱ्या टाटा अल्ट्रा ट्रकच्या (MH 14 GU 6648) चालकाने मद्यधुंद अवस्थेत बोलेरोला जोराची धडक दिली. या धडकेत गाडीतील प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर मदतीसाठी थांबण्याऐवजी आरोपीने ट्रक वेगाने पळवून नेत रस्त्यावरील इतर वाहनांनाही धडक दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरीगोसावी याबाबत अधिक तपास करत आहेत.










































