टोळक्‍याकडून रिक्षा चालकास मारहाण

0
104

वाकड, दि. ७ (प्रतिनिधी)
सात जणांच्‍या टोळक्‍याने एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण करीत दहशत निर्माण केली. ही घटना रहाटणी येथे रविवारी (दि. ४) रात्री साडेदहा वाजताच्‍या सुमारास घडली.

गणेश बालाजी सगर (वय २४, धंदा रिक्षा चालक, रा. श्रीनगर, अष्टविनायक कॉलनी रहाटणी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्‍यांनी मंगळवारी (दि. ६) याबाबत वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मनिष मच्छिंद्रनाथ कदम (वय २२, रा. ज्ञानदिप कॉलनी ,रहाटणी) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. रोहीत शिंदे उर्फ बाँड, सुरज उर्फ पिल्या शिंदे, विजय तलवारे, अनिकेत पाटील, सुजल कांबळे आणि माऊली उपले (सर्व रा. रहाटणी) यांच्‍या विरोधातही गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी मनिष कदम आणि फिर्यादी गणेश सगर हे एकमेकांच्‍या ओळखीचे आहेत. रविवारी रात्री साडेदहा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी गणेश हे श्रीनगर, रहाटणी येथे उभे होते. त्‍यावेळी तिथे आलेल्या आरोपी मनिष याने काहीएक कारण नसताना फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. मी तुला सोडणार नाही, असे म्हणून त्याने त्याचे साथीदार इतर आरोपींना फोन करून बोलविले. त्यातील आरोपी रोहित याने सिमेंटचा गड्ड उचलून फिर्यादचे डोक्यावर मारुन डोक्याला दुखापत केली. आरोपी विजय याने कोयता फिर्यादीचे डोक्यावर मारत असताना फिर्यादी बाजूला झाले तो वार चुकविला. इतर आरोपी मजकुर यांनी फिर्यादीस लाथाबुक्कांनी मारहाण करुन मोठमोठ्याने आरडा ओरडा केला. आरोपी विजय याने कोयता हवेत फिरुन तेथे जमलेल्या लोकांना ‘आम्ही इथले भाई आहोत. तुम्ही मध्ये पडाल तर तुम्हाला सोडणार नाही’, असे बोलल्यामुळे तेथील लोक घाबरुन निघून गेले. तसेच दुकानदारांनी भितीने दुकाने बंद केली.

आरोपी रोहित शिंदे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांकरिता संपूर्ण पुणे जिल्‍ह्यातून तडीपार केले आहे. त्‍याने तडीपारीच्‍या आदेशाचा भंग करीत कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. त्‍याच्‍या विरोधात तडीपारीच्‍या आदेशाचा भंग केल्‍याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.