दि . ५ ( पीसीबी ) – राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल कराच्या नियमात बदल केल्यामुळे, पूल, बोगदे आणि उड्डाणपूल असलेल्या विशिष्ट महामार्गांवरील टोल ५० टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या घटणार आहे.
कोणत्या ठिकाणी हा नवीन नियम लागू होणार?
रस्ते वाहतूक मंत्रालयाने २ जुलै रोजी एक अधिसूचना जारी करून ‘एनएच शुल्क नियम, २००८’ मध्ये ही सुधारणा केली आहे. या नवीन बदलामुळे टोल मोजणीची पद्धत पूर्णपणे बदलण्यात आली आहे. ज्या महामार्गांवरील भागांमध्ये पूल, बोगदे किंवा एलिव्हेटेड रोड यांसारखी मोठी बांधकामे आहेत, त्या ठिकाणी हा नवीन नियम लागू होईल.
नवीन नियमानुसार, टोलची गणना दोन प्रकारे केली जाईल आणि त्यापैकी जी रक्कम कमी असेल, तीच प्रवाशांकडून आकारली जाईल. पहिली गणना ही मार्गावरील मोठ्या संरचनेच्या लांबीच्या दहापट आणि दुसरी गणना ही त्या मार्गाच्या एकूण लांबीच्या पाचपट, अशा दोन पद्धतींनी केली जाईल. यातील कमी रकमेची गणनाच टोलसाठी ग्राह्य धरली जाईल.