टेस्लाचे वरिष्ठ अधिकारी आठवडाभर भारतात

0
289

मुंबई, दि. १७ (पीसीब) : इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. वृत्तसंस्था ब्लूमबर्गने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. देशात टेस्ला वाहनांचा पुरवठा वाढवणे हा या भेटीचा उद्देश आहे. टेस्ला अधिकार्‍यांची ही भारत भेट देखील खास आहे कारण टेस्ला कंपनी चीनला सोडून भारतासोबत आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारताच्या उच्च आयात करांवर आणि इलेक्ट्रिक-वाहन धोरणांवर टीका केली होती. त्यामुळे ही भेट महत्त्वाची असणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्ला एक्झिक्युटिव्ह्जमध्ये सी-सूट एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजर यांचा समावेश असेल जे कंपनीच्या पुरवठा विभागाची देखरेख करतात. या अधिकार्‍यांच्या भारत भेटीचा उद्देश टेस्ला कारची देशात विक्री आणि वितरणा संबंधित चर्चा करणे हा आहे.

माहितीनुसार, टेस्ला अधिकाऱ्यांची भारत भेट अनेक अर्थांनी खास आहे. टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क आणि भारत यांच्यात आधीच वाद सुरू असताना कंपनीचे अधिकारी भारतात येत आहेत. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीला भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा फायदा घ्यायचा आहे. कारण भारत इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला सतत प्रोत्साहन देत आहे, ज्यामुळे जीवाश्म इंधनामुळे होणारे प्रदूषण कमी होत आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ सातत्याने वाढत आहे. भारतीयांची निवड पाहून अनेक परदेशी कंपन्यांनी इलेक्ट्रिक मार्केटमध्ये व्यवसायामध्ये उतरत आहेत. यामध्ये BYD, MG, Kia, Hyundai, Mercedes, BMW, Audi, Volvo अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी भारतात एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहने ऑफरमध्ये ठेवली आहेत. गेल्या वर्षी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जर टेस्ला भारतात आपली इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यास तयार असेल तर काही अडचण नाही परंतु कंपनीने चीनमधून कार आयात करू नये.